सांखळीत उद्या महासभा, मातेच्या अस्तित्वासाठी एक व्हा ’सेव्ह म्हादई’ मंचचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
स्वत:च्या मातेबद्दल खरोखरच अभिमान असलेल्या प्रत्येकाने स्वत:ची राजकीय संलग्नता बाजूला ठेऊन उद्या सांखळीत होणाऱ्या महासभेस उपस्थित राहावे, असे आवाहन ’सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ मंचतर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही स्वत:च केलेल्या घोषणेनुसार राजीनामा देऊन सभेला उपस्थिती दर्शवावी, असे आव्हानही यावेळी देण्यात आले.
शनिवारी सायंकाळी पणजीत आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेस काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आपचे अमित पालेकर, राष्ट्रवादीचे जुझे फिलीप डिसोझा, तृणमूलचे समिल वळवईकर आणि शिवसेनेचे जितेश कामत यांची उपस्थिती होती.
गोवा महाराष्ट्रात विलिनीकरणाच्या मुद्द्यावर यापूर्वी 16 जानेवारी 1967 रोजी जनमत कौल घेण्यात आला होता. आता म्हादईसाठी द्वितीय जनमत कौल घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्याच दिवसाचे औचित्य साधून सर्व विरोधी पक्षांतर्फे सांखळीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी ही सभा सांखळी पालिका मैदानावर घेण्यात येणार होती व त्यासाठी सांखळी पालिकेने परवानगीही दिली होती. परंतु नंतर राजकीय दबावाखाली येत परवानगी मागे घेण्यात आली. मात्र असे असले तरी सदर सभा ही सांखळीतच घेण्यात येईल, असा निर्धार यावेळी वक्त्यांनी बोलून दाखवला. परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आता सदर सभा विर्डी आमोणा पुलाजवळ मैदानावर होईल, अशी माहिती देण्यात आली. त्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
भाजपच्या बी टीमवर टीका
म्हादईच्या विषयावरून लोकांनी एकत्र येऊ नये, त्यांच्यात फूट पडावी या दुष्ट हेतूने सरकारने ’बी टीम’ असा शिक्का बसलेल्या एका पक्षाला पुढे केले असून त्यातूनच त्या पक्षाने आमच्यासोबत राहण्यास नकार देत एकला चलो धोरण स्वीकारले आहे, अशी टीका रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे नाव न घेता करण्यात आली. या भूमिकेमुळे त्यांच्या हेतूविषयीही शंका उपस्थित होत असल्याचे तृणमूलचे समील वळवईकर म्हणाले.
दडपशाहीचा मुकाबला करण्यास आम्ही समर्थ : विजय सरदेसाई
‘म्हादई ही आपली माता’ असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत वारंवार सांगत असतात. त्यामुळे या सभेला त्यांच्यासह चाळीसही आमदारांनी उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. परंतु आज आम्ही याच मातेच्या अस्तित्वासाठी लढा उभारत आहोत, तर तेच मुख्यमंत्री आडकाठी आणत आहेत, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले. मात्र या दडपशाहीचा मुकाबला करण्यास आम्ही समर्थ आहोत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
म्हादईच्या विषयावरून सरकार केवळ टाईमपास करत आहे. त्यामागे कर्नाटकात होणारी निवडणूक हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे भलेही गोमंतकीयांना पाणी मिळाले नाही तरी चालेल, परंतु त्यांनी या विषयावर तोंड उघडू नये, या हेतूने सरकारने ही चालढकल चालविली आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला. गोवा मुक्तीपूर्वी राम मनोहर लोहिया यांना मडगावात सभा घेण्यासाठी पोर्तुगिजांनी परवानगी नाकारली होती. सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत पोर्तुगीज पद्धतीचेच राजकरण करत आहेत, असा आरोपही सरदेसाई यांनी केला. गोमंतकीयांनी आता सुशेगादपणा सोडून म्हादईच्या अस्तित्वासाठी पुढे यावे, सांखळीच्या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न : काँग्रेस
‘सेव्ह गोवा’ हा मंच कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. ही राजकीय चळवळही नाही. हा प्रत्येक गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हीही राजकीय नेत्यांपेक्षा स्वत: गोमंतकीय म्हणूनच त्याला पाठिंबा देत आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.
चळवळ उभारणे क्रमप्राप्त : आप
आपचे अमित पालेकर यांनी बोलताना, प्रसंगी आम्ही पेज जेवून दिवस सारू, पण म्हादईचा लढा कदापि सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. म्हादई यापूर्वीच वळविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री स्वत:च मान्य करतात, त्यावरून याप्रश्नी सरकार काहीच करू शकत नाही, हेच सिद्ध होत आहे. त्यामुळे आता आपल्या मातेच्या रक्षणासाठी प्रत्येक स्वाभीमानी गोमंतकीयाने चळवळ उभारणे क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सभेला उपस्थित राहावे : राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे जुझे फिलीप डिसोझा यांनी बोलताना, आज जर आम्ही म्हादईचे रक्षण करू शकलो नाही, तर ते भविष्यात कदापि शक्य होणार नाही, याचे गंभीर परिणाम आमच्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील, असे सांगितले. एका बाजूने मुख्यमंत्री म्हादईला स्वत:ची आई म्हणून संबोधतात तर दुसऱ्या बाजूने तिच्याच अस्तित्वासाठी लढा देणाऱ्यांना सभा घेण्यास परवानगी नाकारतात हा दुतोंडीपणा का? असा सवाल श्री. डिसोझा यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना खरोखरच आईची काळजी असेल तर त्यांनीही उद्याच्या सभेत उपस्थित राहून आईबद्दलचे आपले प्रेम सिद्ध करावे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी राजीनामा द्यावा : शिवसेना
शिवसेनेचे जितेश कामत यांनी विद्यमान सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार केवळ वायफळ बडबड करते, प्रत्यक्ष कृती काहीच करत नाही, असा आरोप त्यांनी केला. खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकतेच म्हादईच्या विषयावर तोंड उघडले आहे. प्रसंगी राजीनामा देण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आता तो निर्धार सत्यात उतरविण्याची वेळ आली असून नाईक यांनी राजीनामा देऊन उद्याच्या सभेत उपस्थित राहावे, असे आव्हान कामत यांनी दिले.
गाकुवेध महासंघाचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर
दरम्यान, म्हादईच्या रक्षणासाठी विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी, कलाकार, लोकनृत्य कलाकार, लेखक यांनी केलेले आवाहनाला गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर महासंघानेही पाठिंबा जाहीर केला आहे.
गोमंतकीय केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच म्हादईवर अवलंबून नाही, तर येथील बहुतांश आदिवासी समुदायांची उपजीविका शेती, मासेमारी, नगदी पिके, कुळागरे, खाजन जमीनी हे सर्व काही म्हादईवरच अवलंबून आहे. अशावेळी या नदीचे पाणी कर्नाटकात वळवल्यास सत्तरी, डिचोली, सांखळी, तिसवाडी, फोंडा यांसह भागावरही अत्यंत गंभीर परिणाम जाणवणार आहेत, असे मत महासंघातर्फे शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले.
कर्नाटक सरकारने सादर केलेल्या डीपीआरला यापूर्वीच केंद्राने मान्यता दिली आहे. तसेच पाणी वळवण्याचे कामही गुपचूपपणे सुरू झाले आहे. अशावेळी या नदीच्या अस्तित्वासाठी अहंकार आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे या मुद्यावरून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला गोव्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांनी पाठिंबा द्यावा व उद्या सांखळीत होणाऱ्या महासभेस उपस्थिती लावावी, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.









