कास / वार्ताहर :
भारतात सर्वात उंचावरून तीन टप्यात कोसळणारा भांबवलीचा वजराई धबधबा आजपासून पर्यटकांना खुला करण्यात आला. या धबधब्याचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांनी या ठिकाणाला भेट देत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.
कास पठारापासून सहा-सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भांबवलीच्या वजराई धबधब्यातून फेसाळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारा वाहू लागल्या असून, हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वजराई धबधब्याकडे वळू लागली आहेत. पर्यटकांच्या सेवेसाठी या ठिकाणी सातारा वनविभागाच्या आख्यातरीत भांबवली वन समिती कार्यरत असून, त्याच्या माध्यमातून पर्यटकांना सोई सुविधा पुरविण्यासह मार्गदर्शनाचे नियोजन केले जात आहे.
गेल्या वीस दिवसांपासून पावसाची दमदार बँटींग सुरु असल्याने धबधबे, ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. डोंगररांगानी हिरवा शालू नेसला असून घनदाट जंगल अन् त्यात अधूनमधून दाट धुके जोरदार वाऱयासोबत बोचऱ्या थंडीने पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. वजराई धबधब्यासोबतच आजुबाजुचा निसर्ग पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. येत्या चार पाच दिवस पावसाने जोरधार बँटीग केल्यास कास धरण ओव्हर फ्लो होईल. त्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने वजराई धबाधबा आपले आक्राळविक्राळ रूप धारण करून ओसंडून वाहणार आहे.









