ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांची मुक्तता : चर्चेतूनच निघणार तोडगा
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीच्या रियासी जिल्ह्dयातील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिरासाठीच्या रोपवे प्रकल्पाच्या विरोधात निदर्शनांदरम्यान पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 18 जणांची अखेर मुक्तता करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने मंगळवारी रात्री ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांच्या मुक्ततेची घोषणा केली आणि आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. आंदोलकांशी जोवर चर्चा होत नाही तोवर रोपवेचे काम स्थगित राहणार आहे.
श्रीमाता वैष्णोदेवी संघर्ष समितीच्या प्रवक्त्याने काही नेत्यांसमवेत ताब्यात घेण्यात आलेल्या 18 जणांची रियासी आणि उधमपूर तुरुंगातून रात्री एक वाजता मुक्तता करण्यात आल्याची माहिती दिली. मुक्तता झालेल्या आंदोलकांचे कटरा येथे पोहोचल्यावर मोठ्या जमावाने स्वागत केले. दुकाने आणि व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया चालू असून सरकारकडून स्थापन समिती रोपवे प्रकल्पावर चर्चा करणार असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.
सरकारने आमच्या उपोषणासमोर गुडघे टेकले आहेत. सरकारने आमच्या नेत्यांची मुक्तता केली आहे. हे आमचे विजयाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. रोपवे प्रकल्प बंद करण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत असे उपोषणात सामील एका युवकाने म्हटले आहे. भाजप खासदार जुगल किशोर शर्मा यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत सर्व आंदोलकांची मुक्तता करणे सकारात्मक पाऊल असल्याचे उद्गार काढले आहेत.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी रोप वे प्रकरणी तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली असून यात विभागीय आयुक्त, श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक भान आणि बोर्डाचे सदस्य सुरेश शर्मा सामील आहेत. समितीच्या निर्धारित बैठकांदरम्यान सर्व चिंतांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने आंदोलकांना दिले आहे.









