वृत्तसंस्था/ इस्ले ऑफ मॅन (ब्रिटन)
येथे सुरू असलेल्या फिडेच्या स्वीस ग्रँड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची महिला बुद्धिबळपटू आर. वैशालीने नवव्या फेरीअखेर गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले. नवव्या फेरीतील लढतीमध्ये वैशालीने माजी विश्वविजेती बल्गेरियाची बुद्धिबळपटू अॅन्टोनिटा स्टिफेनोव्हाचा पराभव करत पूर्ण एक गुण वसूल केला.
या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या वैशालीने नवव्या फेरीतील लढतीमध्ये आक्रमक चाली करत स्टिफेनाव्हाला पराभूत केले. वैशालीने आतापर्यंत चार ग्रँडमास्टर नॉर्म मिळवले आहेत. आता तिला ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी आणखी सात रेटींग गुणांची जरुरी आहे. हे गुण मिळवले तर ती भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ ठरणार आहे. भारताचा आर. प्रग्यानंदची वैशाली ही मोठी बहीण आहे. वैशालीने नवव्या फेरीअखेर सात गुणासह आघाडीचे स्थान घेतले आहे. या स्पर्धेतील अद्याप दोन फेऱ्या बाकी आहेत. वैशाली आणि चीनची झाँगगेयी तेन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील खुल्या गटात भारताच्या विदित गुजरातीने रशियाच्या इस्पिंकोला बरोबरीत रोखून गुणतक्त्यात 6.5 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या केरुना आणि नाकामुरा यांच्यातील तसेच रुमानियाचा डॅनियल आणि बोगडेन यांच्यातील, इराणचा एम. पेरहाम आणि इस्पिंको यांच्यातील लढती चुरशीच्या झाल्या. या सर्व बुद्धिबळपटूंनी समान गुण मिळवले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी विदित गुजरातीने पांढऱ्या मोहरा घेऊन खेळताना रशियाच्या इस्पिंकोला बरोबरीत रोखले. भारताचा अर्जुन इरीगेसी आणि स्लोवेनियाचा फेडोसेव्ह यांच्यातील लढतही बरोबरीत राहिली. खुल्या गटातील अद्याप दोन फेऱ्या बाकी असून या स्पर्धेसाठी एकूण 460,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.









