वृत्तसंस्था/ समरकंद, उझबेकिस्तान
गतविजेत्या ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे ग्रँड स्वीसच्या महिला विभागात एकट्याने आघाडीवर झेप घेतली असून शनिवारी येथे झालेल्या तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या ओल्गा बेडेलकाला नमवत तिने सलग तिसरा विजय नोंदवला.
या दिवशी वंतिका अग्रवालला मात्र कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आणि ती चीनच्या युक्सिन साँगकडून पराभूत झाली, तर डी. हरिकाला चीनच्या गुओ क्यूने बरोबरीत रोखले. वंतिका आणि हरिका या दोघीही प्रत्येकी 1.5 गुणांवर आहेत, तर वैशालीने तिच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर अर्ध्या गुणाची आघाडी घेतलेली आहे.
खुल्या विभागात विश्वविजेत्या डी. गुकेशने स्पेनच्या डॅनिल युफालाचा धाडसी खेळ त्याच्यावर उलटविला आणि संभाव्य तीनपैकी 2.5 गुणांवर पोहोचण्यात त्याने यश मिळविले. काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना गुकेशने रागोझिन बचावाची निवड केली आणि मधल्या खेळात युफाने आक्रमणावर जोर दिल्याने त्याला आश्चर्याचा धक्काही बसला. प्रतिस्पर्ध्याची एक सोंगाटी गारद केल्यानंतर गुकेशला काही बचावात्मक चाली शोधाव्या लागल्या, पण दुसऱ्या बाजूने युफालाही काही गंभीर आव्हान उभे करता आले नाही. शेवटी भारतीय स्टारने एक सोपा गेम जिंकला.
या दिवशी आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी यांच्या चिकाटीलाही फळ मिळाले. प्रज्ञानंदने माजी विश्वविजेता बोरिस गेल्फँडविरुद्धच्या बरोबरी निश्चित वाटणाऱ्या सामन्यात उसळी घेत त्याला मागे टाकले. अर्जुनचीही अशीच कथा राहिली. त्याने स्लोव्हेनियाच्या अँटोन डेमचेन्कोच्या चुकांचा फायदा घेत विजय नोंदविला.
अन्य महत्त्वाच्या निकालांत अलिरेझा फिरोजाला परहम मगसुदलूकडून पराभूत व्हावे लागले, तर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हने अभिमन्यू पुराणिकला पराभूत केले. लिओन ल्यूक मेंडोन्साचा मॅक्सिम वॅचियर-लाग्रेव्हबरोबरचा, विदित गुजराथीचा अलेक्झांडर प्रेडकेबरोबरचा, निहाल सरीनचा युरी कुझुबोव्हचा तसेच आर्यन चोप्राचा अमीन तबताबाईबरोबरचा सामना बरोबरीत सुटला. दिमित्रीज कोलार्सला व्ही. प्रणवकडून, तर जाखोंगीर वखिडोव्हला पी. हरिकृष्णाकडून पराभूत व्हावे लागले. दिव्या देशमुखने मुरली कार्तिकेयनबरोबरचा सामना बरोबरीत सोडविला.









