सुमारे दहा हजार भाविकांची दररोज उपस्थिती
२७ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम
सरवडे/राधानगरी
जिल्हा व सीमा भाग वारकरी संप्रदाच्या वतीने संत तुकाराम सदेह वैकुंठगमन सोहळा सरवडे येथे 18 ते 27 जानेवारीपर्यंत आयोजित केला आहे. या सोहळ्यात नऊ दिवस पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज सुमारे 10 हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चालू वर्ष संत तुकाराम महाराज यांचे 375 वे सदेह वैकुंठगमन वर्षपूर्ती आहे. त्यानिमित हा सोहळा विशेष आहे. शनिवार 18 रोजी देहू येथून येणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या चलपादुकांची मिरवणूक व मंगलकलश यांची शोभायात्रा काढण्यात येईल. रविवार 19 पासून दररोज पहाटे काकड आरती, महापूजा विधी, संगीत गाथा पारायण, महाप्रसाद, हरिपाठ, संतकथा, हरिकीर्तन आणि संगीत भजन असे नित्याचे कार्यक्रम होणार आहेत.
दररोज सायंकाळी चार ते साडेचार या वेळेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज जीवनचरित्र कथेचे ह.भ.प. रोहित सावंत महाराज आळंदी हे वाचन करणार आहेत. सोहळ्यात राज्यातील नामवंत अशा उमेश दशरथे, पांडुरंग घुले, यशवंतराव पाटील, देवदत्त वास्कर, कान्होबा देहुकर, संजय पाचपोर, उल्हास सूर्यवंशी, अर्जुन लाड, संदीप शिंदे, बाळासाहेब देहूकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. तर सोहळापूर्तीमध्ये बाबुराव पाटील, डॉ. एस. डी. पन्हाळे, पूर्णानंद काजवे, अशोक कौलकर यांची मनोगते होणार आहेत. या सोहळ्याची सांगता सोमवारी 27 जानेवारी रोजी सकाळी पुष्पवृष्टी व महाप्रसादाने होणार असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीने केले.
यावेळी रोहित सावंत, बाबुराव पाटील, डॉ शिवाजी पन्हाळकर, नवनाथ घाटगे, अशोक कौलवकर, राजू चव्हाण, दतात्रय पाटील, बाळासाहेब खाडे, रामभाऊ देसाई, सरपंच रणधीर मोरे, उपसरपंच ए. बी. रानमाळे, दत्तात्रय परीट आदी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सोहळा
तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा जिह्यात घेण्याचा निर्णय झाल्यानंतर सरवडे या गावची निवड झाली. गेले तीन-चार महिने या सोहळ्याचे नियोजन सुरु आहे. जिह्यातील देणगीदार, प्रवचनकार, कीर्तनकार, संत साहित्य अभ्यासक, अध्यात्मिक साधक, भाविक, कलाकार, सामाजिक लोकनेते, व्यावसायिक, तरुण मंडळे व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने नियोजन सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिला सोहळा असल्याने सर्व स्तरातील मंडळी परिश्रम घेत आहेत.
Previous Articleलहानग्यांनी कर्दे बीचवर अनुभवले आकाश दर्शन
Next Article रायगडवर जय जिजाऊ, जय शिवरायचा जयघोष








