युवा कसोटी : मेकॉलमनंतर जलद शतक नोंदवणारा दुसरा फलंदाज, वेदांतचेही शतक
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
यू-19 संघांत सुरू असलेल्या पहिल्या युवा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियन युवा गोलंदाजांची टी-20 स्टाईलने केलेल्या यथेच्छ धुलाईच्या बळावर भारत युवा संघाने पहिल्या डावात 428 धावा जमविल्या. सूर्यवंशीने 86 चेंडूत 113 धावा झोडपताना केवळ 78 चेंडूत शतकी मजल मारत नवा इतिहास निर्माण केला. युवा कसोटीत 100 चेंडूच्या आत शतक नोंदवणारा तो दुसरा फलंदाज बनला आहे. याआधी न्यूझीलंडच्या ब्रेन्डॉन मेकॉलमने हा पराक्रम केला होता. त्याचप्रमाणे वेदांत त्रिवेदीने संयमी शतक (140) नोंदवल्याने भारताला पहिल्या डावात 185 धावांची भक्कम आघाडी मिळाली. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया संघाने 1 बाद 8 धावा जमविल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 243 धावांत आटोपल्यानंतर भारत युवा संघाने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि 81.3 षटकांत सर्व बाद 428 धावा फटकावल्या. आयपीएलमध्ये शतक नोंदवणारा सर्वात युवा फलंदाज बनलेल्या सूर्यवंशीने पहिल्याच षटकात हेडन शिलरला लागोपाठ दोन चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. 2 बाद 69 अशा स्थितीनंतर त्याने वेदांत त्रिवेदीसह तिसऱ्या गड्यासाठी 152 धावांची भागीदारी करीत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सूर्यवंशीने आपल्या खेळीत 8 षटकार व 9 चौकार ठोकले.
वेगवान गोलंदाजांवर त्याने एक्स्ट्राकव्हरच्या पट्ट्यात फटके लगावले तर स्पिनर्सविरुद्ध त्याने स्लॉग स्वीप व कट्चा सढळ वापर केला. इंग्लंडच्या दौऱ्यासाठीही निवड झालेल्या सूर्यवंशीला अद्याप रेडबॉल क्रिकेटमध्ये शतक नोंदवता आले नव्हते. पण ती कसर त्याने या सामन्यात भरून काढली. डावखुरा स्पिनर आर्यन शर्माला शानदार कव्हर ड्राईव्ह मारत या प्रकारातील पहिले शतक नोंदवले. लेगस्पिनर झेड होलिक गोलंदाजीस आल्यावर काऊ कॉर्नर क्षेत्रात त्याने त्याला स्वीपचा षटकार ठोकला. वेगवान गोलंदाजांविरुद्ध रॅम्प शॉट मारत शतकासमीप तो पोहोचला होता. त्रिवेदी व सूर्यवंशी यांच्याव्यतिरिक्त खिलन पटेलने बऱ्यापैकी योगदान दिले. त्याने 49 चेंडूत 49 धावा फटकावल्या. भारतीय युवा संघाने याआधी वनडे मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. आयुष म्हात्रे या संघाचा कर्णधार होता.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया यू-19 संघ प.डाव सर्व बाद 243, भारत यू-19 संघ 81.3 षटकांत सर्व बाद 428 (वैभव सूर्यवंशी 86 चेंडूत 113, वेदांत त्रिवेदी 192 चेंडूत 140, खिलन पटेल 49 चेंडूत 49, अभिज्ञान कुंडू 26, राहुल कुमार 23, हेडन शिलर 3-88, विल मॅलेस्चुक 3-70, आर्यन शर्मा 2-143), ऑस्ट्रेलिया यू-19 संघ दु.डाव 1 बाद 8.









