वृत्तसंस्था / पाटणा
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या गुजरात टायटन्स संघाविरुद्धच्या सामन्यात 38 चेंडूत 101 धावा झोडपणारा 14 वर्षीय सलामीचा डावखुरा फलंदाज वैभव सुर्यवंशीला त्याच्या या दमदार कामगिरीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वैभवचे खास अभिनंदन केले असून त्याला भविष्य काळात सुयश चिंतले आहे. वैभवने टी-20 प्रकारातील दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक झळकविले आहे. त्याने या खेळीमध्ये 11 उत्तुंग षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. वैभव सुर्यवंशीच्या या दणकेबाज फलंदाजीचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही वैभवचे अभिनंदन केले आहे. वैभवच्या या कामगिरीचा बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटतो, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.









