विटा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर टीम वैभव पाटील सक्रिय झाली आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत ‘खानापूर’मध्ये लक्ष घालण्याची मागणी टीम वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपल्या रोखठोक स्वभावासाठी परिचित असणाऱ्या अजित पवार यांनीही मग ‘वैभव, काळजी करू नका, मी आहे’, असे सांगत युवा नेत्यांना पाठबळ देण्याचा मानस व्यक्त केला.
विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, लेंगरेचे माजी सरपंच प्रशांत सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अविनाश चोथे, युवा नेते विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर, आटपाडी, तासगांव तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सवलती देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केली.
त्यावर नेहमीच्या शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैभव पाटील यांना काळजी करू नका, मी आहे. तुम्ही लोकांचे प्रश्न घेऊन या, आपण सोडवणूक करू. काम करीत रहा, लोकांच्यात मिसळून काम करा, असे सांगत प्रशासकीय पातळीवर तुम्हाला अडचण येणार नाही. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा. नविन लोक आपल्यासोबत येत आहेत. त्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. सांगली जिल्ह्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली आहे. त्यामुळे तुम्ही कामात रहा, बाकीचे मी बघतो असे सांगीतले.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच ‘टीम वैभव पाटील’ घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांचे वैभव पाटील यांनी जोरदार स्वागत केले होते. एकुणच वैभव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच ‘टीम वैभव पाटील’ घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांचे वैभव पाटील यांनी जोरदार स्वागत केले होते. त्याचीही चर्चा रंगली होती. आता थेट शिष्टमंडळ घेऊन अजित पवार यांच्या दरबारात हजेरी लावत वैभव पाटील यांनी जिल्ह्यात टीम अजित पवार सक्षम करण्याचा निर्धार अजित पवार यांच्यासमोर व्यक्त केला. एकीकडे पाटील गटाचे राजकीय विरोधक असणारे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. तर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनीही विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे. वैभव पाटील यांची आमदार होण्याची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे वैभव पाटील यांना अजित पवार खरेच ताकद देणार का? याचे उत्तर आता आगामी काळातच ठरणार आहे.