वार्ताहर/हिंडलगा
येथील ग्रा.पं. व्याप्तीतील रामघाट रोड बाजूला असलेल्या वैभवनगर भागात गेल्या कित्येक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले होते. सर्वत्र दुर्गंधी व रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना कित्येक दिवसापासून सहन करावा लागत होता. याकरिता या वॉर्डाच्या सदस्या रेणू गावडे व उपाध्यक्षा चेतना अगसगेकर यांच्यासह नुकत्याच हजर झालेल्या पीडीओ स्मिता चंदरगी यांनी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
या समस्येची दखल घेऊन पाहणी केली व लागलीच ग्रा.पं. कर्मचारी देवाप्पा जगताप व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊन या परिसरातील संपूर्ण कचऱ्याची उचल केली. एकूण पाच ट्रॅक्टर ट्रॉल्यांचा कचरा या भागातून काढण्यात आला व संपूर्ण परिसर स्वच्छ केल्याने येथील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असताना हा परिसर अतिशय स्वच्छ केल्याने वैभवनगर भागातील नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता.
पीडीओ स्मिता चंदरगी, कर्मचारी देवाप्पा जगताप यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदस्य विठ्ठल देसाई, रामचंद्र मनोळकर, राहुल उरणकर, परशराम कुडचीकर, प्रेरणा मिरजकर उपस्थित होते. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय काकतकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी सागर कोलार, कृष्णा तुपारे यांनी अधिकाऱ्यांचे व सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. आभार सचिन सावंत यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी चौगुले यांनी केले.









