प्रतिनिधी/ वडूज/मायणी
भिगवण- मिरज राज्यमार्गावर खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन ओढय़ातील झाडावर आदळल्याने डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. शनिवार दि. 3 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. डॉ. प्रसन्न किशोर भंडारे (वय 35, रा. वडूज, ता. खटाव) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळ व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रसन्न हे मायणी येथील रुरल इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडीकल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी मायणीहून परत वडूजला येताना धोंडेवाडी गावच्या हद्दीत विठ्ठल थोरात यांच्या मालकीच्या शेतानजिक असणाऱया एका ओढय़ात डॉ. भंडारे यांची चारचाकी (एम.एच. 11 बी.व्ही. 9074) गेली. ओढय़ाला लागूनच असलेल्या एका बाभळीच्या झाडावर चारचाकी जोरात आदळली. त्यामध्ये चारचाकीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊन वाहनाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. अपघातात डॉ. भंडारे यांच्या छाती, बरगडय़ा व हृदयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने नजिकच्या काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन ओढय़ातील बाभळीच्या झाडावर आदळून पलटी झालेली चारचाकी पुन्हा उभी करून डॉ. भंडारे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यांच्यासमवेत असणाऱया आधारकार्डवरील पत्त्यामुळे नागरिकांनी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी मेडिकल कॉलेजचे पदाधिकारी, कर्मचारी पोलीस व नागरिकांनी धाव घेतली. मृत डॉ. प्रसन्न हे येथील प्रख्यात आयुर्वेदतज्ञ व माऊली आयुर्वेद व पंचकर्म सेंटरचे संचालक डॉ. किशोर भंडारे यांचे चिरंजीव आहेत. डॉ. प्रसन्न यांनी आयुर्वेदातील एम.डी. चे शिक्षण पूर्ण केले असून ते वैद्यकीय व्यवसायाबरोबरच मायणी येथे आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापनास जात होते. ते वडूज मेडीकल असोसिएशन व निमा या वैद्यकीय संस्थांचे सक्रीय सदस्य होते. त्यांच्या मागे आई, वडील, एक बंधू, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. प्रसन्न यांचे येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी शोकाकूल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मायणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, चारचाकीच्या धडकेने बाभळीच्या झाडातील
बुंध्यातील आतील भाग मोठय़ा प्रमाणावर उघडा पडला होता. तर झाडावरील एक फांदीही तुटली होती. चारचाकीचा पुढील, मागील भाग, इंजिन, चाके, टफ, दरवाजे अश्या सर्वच भागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे अपघाताची भिषणता जाणवत होती.
अपघात घडलेल्या ठिकाणी ओढय़ाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक दगडी कठडे पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वाहनाला अपघात झाल्यास कोणत्याही बचावाची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. आजची अपघातग्रस्त चारचाकी देखील ओढय़ावरील रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने थेट बाभळीच्या झाडावर आदळल्याचे नागरिकांनी सांगितले. या मार्गावरील अनेक ठिकाणी असणाऱया ओढय़ांवर संरक्षक कठडेच नाहीत त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.








