वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यासंबंधी वक्तव्य केल्यावर काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा टीकेला सामोरे जात आहे. त्यांनी मुस्लिमांना कमजोर ठरवत या हल्ल्यामागील कारण भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणाला ठरविले होते. परंतु वाद निर्माण झाल्यावर रॉबर्ट वड्रा यांनी सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. लोक माझ्या वक्तव्याचा पूर्ण अर्थ समजू शकले नाहीत. पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांची हत्या कुठल्याही अर्थाने योग्य नव्हती असे स्पष्टीकरण वड्रा यांनी दिले आहे.
मी हे शब्द पूर्ण प्रामाणिकपणे आणि सत्यासह लिहित आहे. ज्या भावनेने हे शब्द लिहिले जात आहेत, त्याच प्रामाणिक भावनेने ते स्वीकारले जावेत असा मी आग्रह करत आहे. मी जे काही बोललो ते त्याच्या संपूर्ण संदर्भात योग्यप्रकारे समजले गेले नाही हे स्पष्ट आहे. माझ्या उद्देशांची गैर व्याख्या करण्यात आल्याने त्याबद्दल स्पष्टीकरण देणे माझी जबाबदारी असल्याचे उद्गार वड्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काढले आहेत. याप्रकरणी मी काही दिवस मौन राहून प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला, परंतु माझ्या मौनाला उदासीनता किंवा देशभक्तीतील कमी समजले जाऊ नये. स्वत:च्या देशाबद्दल माझे प्रेम, सत्याबद्दल अगाध सन्मान आणि समर्पणाबद्दल प्रतिबद्धतेमुळेच मी बोलण्यापूर्वी चिंतनासाठी वेळ घेतला असा दावा वड्रा यांनी केला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची मी कठोर शब्दांत निंदा करतो. मी भारतासोबत उभा आहे आणि नेहमीच उभा राहणार आहे. निर्दोष-निशस्त्र लोकांविरुद्ध करण्यात आलेल्या हिंसेला माफ करता येईल असा कुठलाही राजकीय धार्मिक किंवा वैचारिक तर्क असू शकत नसल्याचे वड्रा यांनी म्हटले आहे.
अहिंसा सर्वात साहसी पर्याय : वड्रा
रॉबर्ट वड्रा यांनी अहिंसेचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांच्या शिकवणीला आठवावे, त्यांनी अहिंसा सर्वात साहसी पर्याय असतो असा संदेश दिला होता. आमच्या देशवासीयांचे दु:ख आमचे दु:ख आहे. या दु:खाच्या क्षणी कुठलेही मूल, कुठलाही परिवार, कुठलाही समुदाय दहशतवादाच्या सावटाखाली राहू नये अशाप्रकारचे जग निर्माण करण्याची प्रतिबद्धता व्यक्त करतो असे वड्रा यांनी म्हटले आहे.









