फ्लाईंग ऑफिसरपदी निवड
प्रतिनिधी /बेळगाव
पाटील गल्ली, वडगाव येथील प्रथमेश प्रदीप चव्हाण-पाटील यांची एअरफोर्समध्ये टेक्निकल विभागात फ्लाईंग ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर भारतीय वायुदलात भरती होण्याचे स्वप्न त्यांनी अखेर पूर्ण केले आहे. एअरफोर्समध्ये अधिकारी पदावर कार्यरत असणारे ते वडगावमधील नव्या पिढीतील एकमेव तरुण आहेत.
प्रदीप यांचे प्राथमिक शिक्षण सेवंथ डे ऍडव्हेंटिस्ट स्कूलमध्ये झाले. कॉलेजचे शिक्षण सांबरा येथील केंद्रीय विद्यालयात पूर्ण केले. केएलई शेषगिरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून टेलिकम्युनिकेशन विभागात त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले. शिक्षण घेतानाच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न असल्यामुळे इंजिनिअरिंग करत असतानाच सैन्यात कसे भरती व्हावे? यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. या काळात बेंगळूर येथे जनरल मोटर्समध्ये दीड वर्षे काम केले. या दरम्यान एएफ-कॅट ही परीक्षा देऊन म्हैसूर येथे एसएसबीमध्ये मुलाखत दिली. यातूनच त्यांची निवड एअरफोर्सच्या टेक्निकल टिममध्ये झाली.
हैदाबाद येथील एअरफोर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर बेंगळूर येथील एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमध्ये उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यात आले. 8 जुलै रोजी बेंगळूर येथून प्रथमेश यांचा दीक्षांत समारंभ पार पडला. आई-वडील तसेच कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी घेतलेल्या परिश्रमामुळे आपण अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
चव्हाण-पाटलांची चौथी पिढी देशसेवेत
हनुमंतराव चव्हाण-पाटील यांचे बंधू कॅ. गणपतराव चव्हाण हे 1932 मध्ये इंग्रजांच्या काळात किंग्ज कमिशनच्या सैन्यात होते. त्यानंतर कर्नल अजित चव्हाण, कर्नल इंद्रजीत चव्हाण, आजोबा दीनकर चव्हाण, ऑनररी कॅप्टन तात्यासाहेब चव्हाण, वडील नायक प्रदीप दीनकरराव चव्हाण आता प्रथमेश चव्हाण हे देखील सैन्यात भरती झाल्याने चव्हाण-पाटील कुटुंबातील चौथी पिढी देशसेवेत रुजू झाली आहे.









