रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ढिगारे, संबंधितांवर कारवाईची गरज
बेळगाव : वडगाव ते यरमाळ या दरम्यानच्या रस्त्याशेजारी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग टाकण्यात आले आहेत. कोणत्याच विभागाचे लक्ष नसल्यामुळे कचऱ्याचे ढिगारे बळ्ळारी नाल्याच्या परिसरात ओतले जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून हा रस्ता आहे की कचरा डेपो, हे समजणेही अवघड झाले आहे. महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचा फटका शेतकरी तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. वडगाव ते अवचारहट्टीपर्यंतचा रस्ता जोडण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी शेतवडीतून नवीन रस्ता तयार करण्यात आला.
या रस्त्यावर तितकीशी रहदारी नसल्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शहरातील सर्व कचरा नेऊन फेकला जात आहे. घर बांधकामातील शिल्लक राहिलेले साहित्य तसेच इतर कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. बळ्ळारी नाल्यामध्ये कचरा टाकला जात असल्याने कचरा साचून नाल्याचे पाणी शिवारांमध्ये शिरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याची ढीग ओतण्यात आले असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. परिसरात सुपीक शेती असल्याने याचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला
यरमाळ रोडवर बळ्ळारी नाल्यानजीक मोठ्या प्रमाणात कचरा तसेच इतर साहित्य टाकले जात आहे. बऱ्याच वेळा चिकन, मटण दुकानातील शिल्लक राहिलेले अवयव, हॉटेलमधील शिल्लक राहिलेले पदार्थ फेकण्यात येत आहेत. यामुळे बाळकृष्णनगर, शिवगणेश कॉलनी या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी ये-जा करणेही अवघड होत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.









