प्रसूतिगृहाला आरोग्य अधिकाऱयांची प्रतीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत वडगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालय आवारात 10 खाटांचे प्रसूतिगृह उभारण्यात आले आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून वर्ष झाले आहे. तसेच प्रसूतिगृह रुग्णालयाचे लोकार्पण होवून दहा महिने लोटले तरी अद्यापही या रुग्णालयाला टाळे आहेत. त्यामुळे हे रुग्णालय कधी सुरू होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत स्मार्ट प्रसूतिगृह उभारण्याची तरतूद केली होती. इमारत बांधण्याचे काम पूर्ण होवून वर्ष होत आले. दक्षिण भागात विविध ठिकाणी महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे होती. यामध्ये दोन ठिकाणी प्रसूतिगृहाचा समावेश होता. पण वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती केली नसल्याने महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे बंद करण्यात आली आहेत.
होसूर, शहापूर आणि अनगोळ येथे प्रसूतिगृह होते. या ठिकाणी महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या होत्या. मात्र महापालिकेने सदर आरोग्य केंदे बंद केल्याने वडगाव येथे जिल्हा आरोग्य खात्याच्या वतीने प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र या ठिकाणी प्रसूतिसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयावरच नागरिकांना अवलंबून रहावे लागते. गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागडे ठरत आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वडगाव येथे प्रसूतिगृह उभारण्यात आले आहे.
या ठिकाणी 10 बेड, ऑपरेशन थिअटर, प्रयोगशाळा आणि आरोग्य अधिकाऱयांना आवश्यक सुविधा, नर्स रूम, स्टाफरूम आदींसह रुग्णालयात आवश्यक सुविधांसह प्रसूतिगृह सज्ज झाले आहे. उपनगरात प्राथमिक उपचार सेवा उपलब्ध केली आहे. पण प्रसूतिगृह उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही विभागात स्मार्टसिटी योजनेअंतर्गत निधीची तरतूद करून प्रसूतिगृह उभारण्याचे काम हाती घेतले होते. 10 खाटाचे प्रसूतिगृहाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी आवश्यक यंत्रोपकरणे उपलब्ध करून वैद्यकिय अधिकारी, नर्स नियुक्तीची जबाबदारी आरोग्य खात्याची आहे. रुग्णालय सुरू करण्याच्यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची गरज आहे. पण आरोग्य खात्याने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे रुग्णालयाचे उद्घाटन होवून दहा महिने उलटले तरी अद्याप रुग्णालय सुरू करण्यात आले नाही.









