पारंपरिक ढोल वादन : दर्शनासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी
बेळगाव : वडगावचे ग्रामदैवत मंगाईदेवीची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त वडगाव, शहापूर, जुने बेळगाव येथील रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलले होते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करून भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी दिवसभर यात्रेसाठीचा उत्साह दिसून आला.
पारंपरिक पद्धतीने सकाळी धनगरी ढोलांचे वादन करत वडगावमध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली. मंदिरांना भेटी देऊन त्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डोक्यावर ओटीचे सामान घेऊन महिला मंदिरामध्ये दाखल झाल्या. मानकरी चव्हाण-पाटील कुटुंबातील महिला व पुरुषांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरण्यात आली. विधिवतपणे पूजन करून गाऱ्हाणे उतरविण्यात आले. गाऱ्हाणे उतरविताच मंगाईदेवीच्या नावाने जल्लोष करण्यात आला.
मंगाईदेवी मंदिर परिसरात अनेक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. फुले, ओटी भरण्याचे साहित्य, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रचंड गर्दी असल्यामुळे दर्शनासाठीच्या रांगा दूरपर्यंत गेल्या होत्या. श्रीफळ फोडण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू होती. यावर्षी मंदिराला संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमा लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे हे चित्र मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे दिसून आले.
रस्ते गर्दीने फुलले
वडगावमधून मंदिरापर्यंत जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. यात्रेनिमित्त मोठमोठ्या कमानी उभारून शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर कृत्रिम फुले, दागिने, फुगे, रांगोळ्या, गृहोपयोगी साहित्य, लहान मुलांची खेळणी यांच्या खरेदीसाठी चिमुकले व महिलांची गर्दी झाली होती. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तरुणाईचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळनंतर आकाश पाळणे व इतर खेळ पाहण्यासाठी लहान मुलांची रिघ लागली होती.
नियोजनाअभावी वाहतूक कोंडी
मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी येळ्ळूर कॉर्नर तसेच अंतर्गत भागात बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. परंतु सायंकाळी 6 नंतर चार चाकी वाहनचालकांनी मुख्य रस्त्याशेजारी वाहने लावण्यास सुरुवात केली. यामुळे येळ्ळूर रोडवर रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. येळ्ळूर तसेच पुढील इतर गावांना जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. त्यामध्ये काही बस अडकून पडल्याने प्रवाशांचीही गैरसोय झाली. गर्दीच्या मानाने पोलीस बंदोबस्त तोकडा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.









