खचलेल्या रस्त्यामुळे युवक गंभीर जखमी
बेळगाव : महिन्याभरापूर्वी केलेला वडगाव-अनगोळ रस्ता खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या खचलेल्या रस्त्यामुळे एका वाहनचालकाचा जबर अपघात झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम झाले असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वडगाव-अनगोळ रस्त्याचे मागील काही वर्षांपासून रुंदीकरणाचे काम सुरू होते. संथगतीने काम केले जात असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. केवळ दीड किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागला. नागरिकांची घरे हटवून रस्ता रुंदीकरण करण्यात आले. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महिन्याभरातच रस्ता खचला. त्यामुळे यासाठीच रुंदीकरणाचा अट्टाहास केला होता का? असा खोचक प्रश्न नागरिक विचारत आहेत. मागील आठवड्याभरापासून बेळगाव परिसरात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री रस्ता खचला. इतकी वर्षे रखडलेला रस्ता केवळ श्रेयवादासाठी घिसाडघाईने पूर्ण केल्याचा आरोपही होत आहे. खचलेला रस्ता रात्रीच्यावेळी निदर्शनास न आल्याने अपघात घडला. खादरवाडी येथील सचिन पाटील हा युवक वडगाव-अनगोळ रोडने दुचाकीवरून जात होता. खचलेला रस्ता रात्रीच्यावेळी निदर्शनास न आल्याने त्याने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे तो रस्त्यावर आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाली असून खासगी इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत.
कंत्राटदार-अधिकारी धारेवर
सोमवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर, तसेच अनगोळ व वडगावमधील नागरिकांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. कंत्राटदाराला बोलावून धारेवर धरले. निकृष्ट कामामुळे कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी करण्यात आली.
कानउघाडणी करताच दुरुस्ती
कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना धारेवर धरताच सोमवारी सकाळी 11 नंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. जेसीबीच्या साहाय्याने खचलेला रस्ता उखडून टाकण्यात आला. त्याठिकाणी खडी व इतर साहित्य घालण्यात आले आहे.









