भाजप नेते पृथ्वीराज पवार वडाप वाल्यांची केली घेराबंदी
सांगली : पोलिस, एसटी, वाहतूक नियंत्रक, आरटीओ या सर्व विभागांना झुगारून, आरेरावी करत एसटी स्थानकासमोरून वडाप वाहतूक करणाऱ्या रिक्षावाल्यांना आज हाकलून काढण्यात आले. भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी त्यांची घेराबंदी केली. ते या प्रश्नी रस्त्यावर उतरल्याने एसटीचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, आरटीओ अधिकारीही तातडीने तेथे दाखल झाले.
या ठिकाणी वडापचा अड्डा पुन्हा खपवून घेणार नाही, असा सज्जड दम त्यांना देण्यात आला. पन्नासहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. बसस्थानकासमोरच नेहमीप्रमाणे आजही वडापची वाहने लागली होती. दिवाळी तोंडावर असल्याने रस्त्यावरवाहनांची संख्या अधिक होती. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी सुरु होत्या. महिला, मुलींनी वाट काढत जाणे कठीण झाले होते.
काही वाहतूकदार महिला, मुलींनी द्विअर्थी भाषेत छेडत असल्याची तक्रार आली होती. त्याची दखल घेत पृथ्वीराज पवार वाहनातून तेथे गेले. त्यांची गाडीही या कोंडीत सापडली, त्यांनी तेथेच घेराबंदी केली. वडापवाल्यांना घेरले. त्यांनी वाहतूक करता येऊ नये, असा चक्रव्यूह रचला. वातावरण तंग झाले. एसटी, महापालिकेसह इतर वाहने या कोंडीत अडकली.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनीदेखील हजेरी लावली. पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्यानंतर वडापवाल्यांना तेथून हाकलून देण्यात आले. वडापची वाहने हटल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. व्यापाऱ्यांनी या प्रश्नावर पृथ्वीराज यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले.
स्थानिकांनी सांगितले की, एसटी बसस्थानकातून वाहन बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वडापची वाहने उभी असतात. महिलांशी अरेरावीने बोलतात. ‘चल बस, येणार का?‘ असे द्विअर्थी देखील बोलले जातात. वडापची वाहने लागल्याने दुकानदारांना याचा त्रास होत आहे. ग्राहकांच्या वाहनांसाठी जागा उपलब्ध होत नाही. याबाबत एसटी प्रशासनाने पोलिस अधीक्षक, आरटीओकडे वारंवार तक्रार केल्या आहेत.








