रेबीज प्रतिबंधक मोहिमेला प्रतिसाद : जिल्ह्यात 75 टक्के लसीकरण, सर्वाधिक रायबाग तालुक्यात
बेळगाव : पशुसंगोपन खात्यामार्फत राबविण्यात आलेल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीमला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 49 हजार 350 श्वानांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित श्वानांसाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. अलिकडे कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्याने ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली आहे. जिल्ह्यात 78 हजारांहून अधिक श्वानांची संख्या आहे. त्यापैकी 49 हजार कुत्र्यांपर्यंत लस पोहोचविण्यात आली आहे. कुत्रा चालण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे रेबीजचा प्रश्न समोर येवू लागला आहे. यासाठी पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना मागील दोन महिन्यांपासून लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील 193 लहान मोठ्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून मांजर आणि कुत्र्यांना लस टोचण्यात आली आहे. त्याबरोबर विविध ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करुन लस देण्यात आली आहे.
विशेषत: सर्वाधिक रायबाग तालुक्यातील 10 हजार 760 कुत्र्यांना लस देण्यात आली आहे. तर सर्वात कमी गोकाक तालुक्यामध्ये केवळ 605 कुत्र्यांना लस दिली गेली आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत शाळा स्तरावर रेबीज जागृती करण्यात आली होती. त्यामुळे यंदा रेबीजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अलिकडे पाळीव कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जर्मन शेफर्ड, लॅब, मुधोळहाऊंड यासह इतर जातीची कुत्री पाळली जातात. या कुत्र्यांना वर्षातून दोनवेळा रेबीज प्रतिबंधक लसीकरण घेणे गरजेचे आहे. रेबीजचा अटकाव करण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत मोफत कुत्री आणि मांजरांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 75 टक्के कुत्र्यांपर्यंत ही लस पोहोचविण्यात आली आहे. विशेषत: शहर, ग्रामीण भाग आणि दुर्गम भागातील सर्व परिसरात लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे.
तालुका लसीकरण करण्यात आलेल्या श्वानांची संख्या
- अथणी 5937
- कागवाड 2415
- बेळगाव 2385
- बैलहोंगल 1559
- चिकोडी 6250
- गोकाक 605
- हुक्केरी 2954
- कित्तूर 800
- खानापूर 4500
- मुडलगी 1245
- रामदुर्ग 4198
- निपाणी 1761
- सौंदत्ती 3028
- रायबाग 10760
- यरगट्टी 953
- एकूण 49350









