रेबीज लसीकरण मोहीम : सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज
बेळगाव : जीवघेण्या रेबीजला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील 77 हजार पाळीव कुत्र्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: भटक्या कुत्र्यांकडूनच हल्ले होतात. त्यामुळे प्रथमत: भटक्या कुत्र्यांनाच लसीकरणाची गरज आहे. मात्र भटकी कुत्रीच लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 30 सप्टेंबरपासून एक महिना मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातून सकाळी 9 ते 1 या वेळेत मांजर, कुत्र्यांना लस टोचली जात आहे. रेबीजचा अटकाव करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्याही मोठी आहे. मात्र लसीकरणाअभावी ही कुत्री मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पाळीव कुत्र्यांचे लसीकरण आणि भटकी मात्र मोकाट असे चित्र दिसत आहे. खात्यामार्फत खबरदारी म्हणून 14 लाख लसीकरणाचा पुरवठा करण्यात आला आहे. शिवाय एकही श्वान लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. अलिकडे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. विशेषत: कुत्री लहान बालकांना टार्गेट करु लागली आहेत. त्यामुळे रेबीज लसीकरण करणे गरजेचे बनले आहे. पाळीव कुत्र्यांचे लसीकरण होत असले तरी भटकी मात्र लसीकरणापासून दूरच असल्याचे दिसत आहे.
प्राणीप्रेमींकडून सहकार्याची अपेक्षा
भटक्या कुत्र्यांना लसीकरण करण्यासाठी समाजातील सामाजिक संघटना, प्राणीप्रेमी आणि इतर संघटनांनी सहकार्याची भूमिका बजावल्यास भटक्या कुत्र्यांना देखील लस दिली जाईल, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.









