4 ते 8 वयोगटातील वासरांना लस : रोगापासून दूर ठेवण्यासाठी घरोघरी उपचार : लागण झाल्यास जनावरे दगावण्याची भीती
बेळगाव : पशुसंगोपन खात्यामार्फत ब्रुसेलोसीस या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. 4 ते 8 वयोगटातील मादी जातींच्या वासरु आणि रेडकांना लस टोचली जात आहे. पशुपालकांनी आपल्या गाईच्या वासरांना आणि म्हशीच्या रेडकांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
अलीकडे जनावरांना विविध प्रकाराचे आजार जडू लागले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जाणार आहे. ब्रुसेलोसीस हा महाभयानक रोग असून जनावरांना लागण झाल्यास गर्भपात होतो. शिवाय संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यास मानवालादेखील याचा धोका उद्भवतो. लागण झालेल्या जनावरांचे दूधही शरीरास अपायकारक आहे. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच काळजी घेऊन मादी जातीच्या वासरु आणि रेडकांना लस द्यावी.
जिल्ह्यात 28 लाखाहून जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, ससे, शेळ्या मेंढ्या आदींचा समावेश आहे. यापैकी 34 हजार 150 वासरू आणि रेडकांची संख्या आहे. या सर्वांना लस टोचली जाणार आहे. सद्य परिस्थितीत अद्याप जिल्ह्यात ब्रुसेलोसीस एकही प्रकरण समोर आले नाही. मात्र खबरदारी म्हणून खात्याने प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली आहे.
लस घेण्याचे पशुपालकांना आवाहन
या संसर्गजन्य रोगांची लागण झाल्यास गर्भपात होऊन जनावर दगावते. यासाठी भविष्यातील धोका टाळण्यासाठी लहान मादी जातींच्या चार ते आठ वयोगटातील वासरू आणि रेडकांना लस घेणे आवश्यक आहे. अलीकडे जनावरांना लम्पी, लाळ्या-खुरकत आदी गंभीर आजाराची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांना प्रतिबंधक लस टोचून घेणे गरजेचे बनले आहे.
लसीकरण मोहीम अधिक तीव्र
जिल्ह्यात सर्वत्र ब्रुसेलोसीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याबरोबर रेबीज लस दिली जात आहे. काही ठिकाणी लम्पी प्रतिबंधक लस टोचली जात आहे. एकूणच जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे.









