44 जनावरे लम्पिमुक्त : 14 हजार जनावरांच्या गोठय़ापर्यंत पोहोचली लस : अद्यापही लागण सुरूच : पशुपालकांच्या धास्तीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
‘लम्पी’ त्वचारोगाचा झपाटय़ाने प्रसार होत असल्याने शेकडो जनावरांना याची लागण झाली आहे. रोगाची तीव्रता अधिक असल्याने काही जनावरे दगावली आहेत. दरम्यान, रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपनमार्फत मोफत प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत 14 हजार जनावरांना ही लस पोहोचविण्यात आली आहे. पशुसंगोपनाला दिलासादायक बाब म्हणजे 44 जनावरे लम्पिमुक्त झाली आहेत. मात्र, अद्यापही लागण सुरूच आहे. त्यामुळे पशुपालकांची धास्ती वाढली आहे.
तालुक्मयातील पूर्व भागात विशेषतः या रोगाची तीव्रता अधिक आहे. शिंदोळी, बसरीकट्टी, मोदगा, मारिहाळ, निलजी, सांबरा, कणबर्गी, चंदगड-अष्टे, खनगाव, मुचंडी, सुळेभावी आदी गावांतून या रोगाची जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे उपचारासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्यामार्फत रॅपिड ऍक्शन पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत बाधित जनावरांच्या गोठय़ात जाऊन तात्काळ उपचार केले जात आहेत.
जनावरांचा विमा हितकारक
पूर्व भागात आतापर्यंत 12 जनावरांचा या रोगाने मृत्यू ओढवला आहे. अशा परिस्थितीत ज्या पशुपालकांनी पशुधन विमा पॉलिसी भरली आहे, त्यांना भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ज्यांनी पॉलिसीकडे दुर्लक्ष केले आहे, त्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विमा पॉलिसीचे महत्त्व आता अधोरेखित होत आहे. अपघात, आजार, रोगराई अशा संकटकाळात विमा पॉलिसी आधार ठरते. यासाठी जनावरांचा विमा हितकारक ठरतो.
लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
लम्पिस्कीन हा संसर्गजन्य आजार गाय आणि बैलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ गोवंशाची मोठी हानी झाली आहे. तालुक्मयात 52 हजार गायी-म्हशी आहेत. त्यापैकी 14 हजार जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांनाही लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लम्पिस्कीनबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्याने गावोगावी जनजागृती केली जात आहे. बाधित जनावरे चरण्यासाठी किंवा शर्यतीसाठी बाहेर नेऊ नयेत. गोठा स्वच्छ करून धूर करावा. गोठय़ात जाळीचा वापर करावा. बाधित जनावर स्वतंत्र बांधावे.
केवळ पूर्वभागातच रोगाचा अधिक फैलाव
‘लम्पी’ रोगाचा फैलाव आतापर्यंत केवळ पूर्व भागातच अधिक दिसून आला आहे. इतर भागात या आजाराचे एकही जनावर आढळून आले नाही, ही पशुसंगोपनसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, इतर ठिकाणी हा रोग पसरू नये, यासाठी तालुक्मयात सर्वच गावांतील जनावरांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. मागील महिनाभरापासून पूर्व भागात या रोगाचा प्रसार सुरू असला तरी अद्याप तालुक्मयाच्या इतर ठिकाणी अशा आजाराच्या लक्षणाचे एकही जनावर आढळून आले नाही, अशी माहिती पशुसंगोपनने दिली. शिवाय सर्वत्र प्रतिबंधक लस देऊन रोग आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सर्व गावांमध्ये प्रतिबंधक लस
तालुक्मयात असलेल्या 39 लहान-मोठय़ा सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये प्रतिबंधक लस दिली जात आहे. बाधित गावे वगळून इतर सर्व गावांमध्ये गायी-म्हशींना लस दिली जात आहे. त्यामुळे रोगावर लवकरच नियंत्रण येईल.
– डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)









