इश्वाक सिंह मुख्य भूमिकेत
‘पाताल लोक’ आणि ‘रॉकेट बॉय’द्वारे स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता इश्वाक सिंह लवकरच अभिनेत्री वाणी कपूरसोबत झळकणार आहे. ‘सर्वगुण संपन्न’ या सामाजिक विनोदी धाटणीच्या चित्रपटात हे दोघेही मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘सर्वगुण संपन्न’ हा दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सकडून निर्मिला जाणार आहे. तसेच सोनाली रतन या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहेत. रॉकेट बॉयज 2 ला मिळालेल्या मोठ्या यशनातंर इश्वाक सिंह आता वाणीसोबत दिसून येणार आहे. सर्वगुण संपन्न हा चित्रपट 1990 च्या दशकावर आधारित आहे. चित्रपटात वाणी ही एका पोर्न स्टारची भूमिका साकारणार आहे. रॉकेट बॉयजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील इश्वाकच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. इश्वाक आता चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्याच्या तयारीत आहे. इश्वाकने चित्रपटाच्या चित्रिकरणातही भाग घेतला आहे. वाणी कपूरसोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना पसंत पडेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. सर्वगुण संपन्न हा चित्रपट विनोदी तसेच सामाजिक मुद्द्याला स्पर्श करणारा आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत समकालीन मुद्द्यांवर एक नवा दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर मांडला जाणार असल्याचे दिग्दर्शकाचे सांगणे आहे.









