माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन : उपकुलपतींसह मान्यवरांची उपस्थिती
खानापूर : लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक तसेच दै. ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून खानापूर येथे लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता ‘लोकमान्य भवन’ येथे माजी मंत्री आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत. व्हीटीयूचे व्हा. चान्सलर डॉ. एस. विद्यासागर तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाचे व्हा. चान्सलर सी. एम. त्यागराज तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार अंजली निंबाळकर तसेच डॉ. वाय. एन. दोडमणी, वासुदेव आप्पाजीगोळ आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे सचिव सत्यव्रत नाईक, संयोजक डी. एन. मिसाळे आणि प्राचार्य शिरीष केरूर यांनी दिली.
लोकमान्य सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांनी सामाजिक बांधिलकी जपत लोकमान्य संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. खानापूर तालुका दुर्गम भाग असल्याने तसेच खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी हा दूरदृष्टिकोन ठेवून खानापुरात अद्ययावत सुसज्ज असे तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळविलेली आहे. माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या नावे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यात पाच विभाग सुरू करण्यात आले असून जवळपास 400 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय होणार असल्याचे डी. एन. मिसाळे यांनी सांगितले.
व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाची माहिती देताना सत्यव्रत नाईक म्हणाले, बाबुराव ठाकुर यांच्या प्रेरणेतून डॉ. किरण ठाकुर यांनी तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचावी हा उद्देश ठेवून खानापूरसारख्या दुर्गम भागात पहिलेच तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्याचे धाडस केले आहे. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या योगदानाचा विचार करून त्यांच्या नावे खानापुरात पहिलेच तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षणाची सोय यामुळे झाली आहे. अजूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्राचार्य शिरीष केरूर माहिती देताना म्हणाले, प्रत्येक विभागात 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उच्चशिक्षित तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे प्राध्यापकवर्ग नेमण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अतिशय सुसज्ज अशी लॅबोरेटरी, लायब्ररी तसेच कॉम्प्युटर लायब्ररी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक प्रवेश शुल्कात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्dया योजना राबविण्यात येणार आहेत, असे सांगितले.
अद्यापही प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय
खानापुरात प्रथमच तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या तांत्रिक विभागांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक महाविद्यालयात अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून खानापूरहून बेळगावला बसची सोय करण्यात आली आहे. ही बस सकाळी 7.30 वाजता खानापूरहून निघून बेळगाव रेल्वेस्टेशन येथून पुन्हा खानापूर येथील व्ही. वाय. चव्हाण महाविद्यालयात येणार आहे. दुपारी 4 नंतर पुन्हा बेळगावला पोहचणार आहे.









