मयुर चराटकर
बांदा
कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर प्रशालेचे प्रि प्रायमरी वर्ग सध्या आहेत तेथेच सुरु राहतील. पालकांच्या आग्रही मागणीवरुन शिक्षण प्रसारक मंडळ बांदाच्या अध्यक्षांकडे १ नोव्हेंबर रोजी चावी सुपूर्द करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित केल्याची माहिती कामत चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मंगेश कामत यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची चार वर्गखोल्यांची इमारत भाडेकराराने शिक्षण प्रसारक मंडळाकडे दिलेली आहे. सदर इमारतीत कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचे प्रि प्रायमरी वर्ग सुरु आहेत. सदर जि. प. अखत्यारीतील इमारत बांदा केंद्रशाळेला मिळावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडले होते. मात्र या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी भूमिका घेऊन माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला विरोध केला. यामुळे पालक व माजी विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर चेअरमन मंगेश कामत यांनी १ नोव्हेंबर रोजी सदर इमारतीची चावी एसपीएम संस्थेच्या अध्यक्षांकडे देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याबाबत पालकांनी तातडीने चेअरमन मंगेश कामत यांची बुधवारी भेट घेतली. मुलांची मानसिकता व पर्यायाने त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, प्रवास खर्च यावर चर्चा झाली.
यावेळी पालक हुसेन मकानदार, सुनील राऊळ, अभिजित देसाई, आदिती घोगळे, जान्हवी सावंत, सोनाली धुरी आदी उपस्थित होते. यावेळी पालकांनी अचानक शाळा बदलल्यास मुलांवर होणारे परिणाम व अन्य समस्या मांडल्या. चावी सुपूर्द करण्याचा निर्णय बदलण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. त्यानुसार सध्या सुरु असलेले वर्ग आहेत तेथेच नियमित सुरु राहतील असे चेअरमन कामत यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.