सूर्याचा कल उत्तरेकडे : उत्तरायणपासून शुभ कार्यांना सुरुवात : 21 जूननंतर दक्षिणायन
बेळगाव : मकर संक्रांतीनंतर उत्तरायणला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. एकूण 12 राशी असून सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करते. सूर्य प्रत्येक राशीत प्रवेश करण्याला तितके महत्त्व नाही. पण, सूर्याचा मकर आणि कर्क राशीत जेव्हा प्रवेश होते त्या वेळी मोठे स्थित्यंतर घडत असते. मकर राशीत सूर्याचा प्रवेश होताच सूर्याचा कल हळूहळू उत्तरेकडे सुरू होतो. त्यामुळे रात्र हळूहळू लहान होत जाऊन दिवस मोठा होत जातो. ही स्थिती पुढील सहा महिने असते. प्रत्येक वर्षी 21 डिसेंबरला उत्तरायणची सुरुवात होते. उत्तरायणचा काळ हा 21 डिसेंबर ते 21 किंवा 22 जून असा सहा महिन्यांचा आहे. सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होणे याला कर्क संक्रांत असे म्हटले आहे. या दिवसापासून दक्षिणायनची सुरुवात होत असते. दक्षिणायनात दिवस हळूहळू लहान होत जाऊन रात्र मोठी होते. हा काळही पुढील सहा महिन्यांचा म्हणजे 21 किंवा 22 जून ते 21 डिसेंबरपर्यंत असतो. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाला उत्तरायण व कर्क राशीतील प्रवेशाला दक्षिणायन म्हटले जाते.
उत्तरायणचे महत्त्व
उत्तरायण हे शास्त्रानुसार शुभ मानले गेले आहे. नद्यांच्या संगम स्थळावर स्नान केल्यास सुख-समृद्धी लाभते, अशी समाजाची धारणा आहे. उत्तरायणचा काळ देवदेवतांचा दिवस व दक्षिणायन हा रात्रीचा काळ मानला जातो. उत्तरायणचा काळ हा ज्ञानप्राप्तीसाठी तर दक्षिणायन हा शुद्धीकरणासाठी आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात असतो. वैदिक शास्त्रात उत्तरायणला देवयान आणि दक्षिणायनला पितृयान असे म्हटले आहे. मकर संक्रांतीनंतर माघ महिन्यात उत्तरायणपासून शुभ कार्यांना सुऊवात होते. उलटपक्षी दक्षिणायन हा कमी शुभ काळ मानला जातो. या काळात नकारात्मक ऊर्जा व दिवस लहान असतात. त्यामुळे शुभ कार्याला हा काळ फारसा ग्राह्य धरला जात नाही. पण, परंपरेप्रमाणे आलेले सण व त्या अनुषंगाने शुभ मुहूर्त (विजयादशमी, बलिप्रतिपदा) याला अपवाद आहेत.









