वृत्तसंस्था/ पंचकुला (हरियाणा)
येथे सुरु असलेल्या हॉकी इंडियाच्या 15 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या दिवशी उत्तराखंड, दिल्ली आणि छत्तीसगड संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले. अ गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात उत्तराखंडने बिहारचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात उत्तराखंडतर्फे बिना पांडेने 9 व्या आणि 58 व्या मिनिटाला असे 2 मैदानी गोल केले. उत्तराखंडचा तिसरा गोल पेनल्टी कॉर्नवर वर्तिका रावतने नोंदविला. या सामन्यात शेवटपर्यंत बिहारला आपले खाते उघडता आले नाही.
ब गटातील झालेल्या सामन्यात दिल्लीने चंदीगडचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. या सामन्यात पाचही गोल उत्तरार्धात नोंदविले गेले. दिल्लीतर्फे कर्णधार रुबीने 32 व्या आणि 38 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. प्रियांकाने 35 व्या मिनिटाला 1 गोल नोंदविला. 36 व्या मिनिटाला चंदीगडचा एकमेव गोल अलकाने नोंदविला. 51 व्या मिनिटाला दिल्लीचा चौथा गोल दिव्याने नोंदविला. ब गटातील अन्य एका सामन्यात छत्तीसगडने हिमाचल प्रदेशचा 5-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. छत्तीसगडतर्फे अनिशा साहूने 20 व्या आणि 24 व्या मिनिटाला तर अनिता खुसरोने 5 व्या मिनिटाला, संपदा निर्मलकरने 33 व्या आणि शबीनाझ अन्सारीने 57 व्या मिनिटाला गोल केले. हिमाचलप्रदेशचा एकमेव गोल 43 व्या मिनिटाला भूमिका चव्हाणने केला. अ गटातील अन्य एका सामन्यात केरळने गुजरातचा 10 गोलांनी पराभव केला. केरळ संघातील कविताने 6 गोल केले. क गटातील सामन्यात आंध्रप्रदेशने अरुणाचल प्रदेशचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला. आंध्रप्रदेशतर्फे लोटेला मेरीने 5 गोल नोंदविले.









