वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेश विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार दारासिंग चौहान यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. दारासिंग चौहान हे पूर्वी भाजपच्या योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात मंत्री होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपचाही त्याग केला होता. नंतर त्यांनी सपमध्ये प्रवेश करत मऊ जिल्ह्यातील घोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. पण आता सपमध्ये आपला भ्रमनिरास झाला आहे असे कारण देत त्यांनी त्यांचे त्यागपत्र उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांच्याकडे सोपविले आहे. हा समाजवादी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
दारासिंग चौहान हे अन्य मागासवर्गिय समाजातील प्रभावी आणि वजनदार नेते मानले जातात. त्यांचा किमान 12 मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे, असे बोलले जाते. राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. समाजवादी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सप नेते अखिलेश यादव यांनी दारासिंग चौहान यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन आमदार बनविले होते. त्यांनी असा विश्वासघात करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सपच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली. चौहान कोणत्या पक्षात जाणार या संबंधी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही.









