ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नवाबगंजच्या विद्युत विभागाच्या कार्यालयामध्ये एक फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेनचा आहे. नवाबगंजच्या इलेक्ट्रिसिटी कार्यालयात (Electricity Office) लावलेला ओसामा बिन लादेनचा फोटो व्हायरल झाल्यानतंर खळबळ उडाली आहे. फोटोखाली श्रद्धेय ओसामा बिन लादेन (Osama bin Laden) जगातील सर्वोत्कृष्ट अवर (ज्युनिअर) इंजिनिअर असंही लिहिलं आहे. त्यानंतर खाली एसडीओ रविंद्र प्रकाश गौतम असं नाव आहे.
विशेष म्हणजे याविषयी एसडीओ नवाबगंज यांच्याशी बोलले असता त्यांनी स्वत: हा फोटो ऑफिसमध्ये लावल्याचे मान्य केले. त्याचबरोबर कोणीही कोणालाही आदर्श मानू शकतो, असेही सांगण्यात आले. मात्र, हा फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ऑफिसमधून काढून हटवण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी रविंद्र प्रकाश गौतम यांनी ओसामा बिन लादेन आमचा गुरु असल्याचं म्हटलं आहे. जर फोटो हटवला तर दुसरा लावेन. हा फोटो मी लावला होता असंही रविंद्र प्रकाश गौतम म्हणाले. दुसरीकडे इतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.
इंजिनिअर एस के श्रीवास्तव यांनी याबाबत सांगितले की, इलेक्ट्रीसिटी ऑफिसमधला घडलेला प्रकार मला समजला आहे. याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. नवाबगंज वीज वितरण कार्यालयाच्या परिसरात वेटिंग रूम आहे. त्याच्या भिंतीवर लादेनचा फोटो लावण्यात आला असल्याचा फोटो व्हायरल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर फोटो हटवण्यात आला आहे.