टार्गेट किलिंगची घटना : काश्मीर खोऱ्यात चोवीस तासात दुसरा दहशतवादी हल्ला
वृत्तसंस्था/ श्रीनगर
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील एका मजुराची हत्या केली. नौपोरा परिसरात ही घटना घडली. मुकेश कुमार असे या मजुराचे नाव आहे. सोमवारी दुपारी 12:45 वाजता मुकेशला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला तातडीने ऊग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काश्मीर खोऱ्यात 24 तासांत झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. रविवारी संध्याकाळी श्रीनगरच्या ईदगाह भागात एका दहशतवाद्याने पोलीस निरीक्षक मसरूर वाणी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यांच्या पोटात, मानेला आणि डोळ्यांना गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली होती. वाणी हा काही मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर ईदगाह परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
कुपवाडा येथे दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे.









