70 वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, अहमदनगर : गोवा, विदर्भाचे आव्हान संपुष्टात
प्रतिनिधी/ अहमदनगर
गतविजेत्या भारतीय रेल्वेसह, उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान यांनी 70व् या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गोवा, विदर्भ यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
उपउपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशने दिल्लीचा प्रतिकार 47-30 असा मोडून काढला. उत्तर प्रदेशने पहिले सलग 4 गुण घेत आक्रमक सुरुवात केली. दिल्लीने राहुल चौधरीची पकड करीत गुणांचे खाते खोलले. 16व्या मिनिटाला लोण देत दिल्लीने 19-11 अशी आघाडी घेतली. मध्यांतराला 25-15 अशी यु.पी. कडे आघाडी होती. मध्यांतरानंतर दिल्लीच्या विनीत मावीने 3 गडी टिपत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण यू.पी.ने 5 अव्वल पकड करीत दिल्लीचे मनसुबे उधळून लावले.
अन्य एका लढतीत चंदीगडने गोव्याचा प्रतिकार 44-40 असा संपुष्टात आणला. विश्रांतीला 23-19 अशी चंदीगड कडे आघाडी होती. सामना सतत दोलायमान स्थितीकडे झुकत होता. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना 40-40 अशी बरोबरी होती. गोव्याने 5 अव्वल पकड करीत सामन्याची रंगत वाढविली. नरेंदर, राकेश यांच्या जोशपूर्ण चढाया, तर विशाल भारद्वाजचा भक्कम बचाव यामुळेच चंदीगड यशस्वी झाले. पवन कुमारला पंचानी हिरवे कार्ड दाखविले. गोव्याकडून नीरज, आशिष, सुंदर यांनी सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.
रेल्वे, महाराष्ट्राचा दणकेबाज विजय
भारतीय रेल्वेने पंजाबचे आव्हान 43-22 असे संपुष्टात आणले. पहिल्या डावात 20-09 अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेने शेवटी 21 गुणांनी सामना खिशात टाकला. तर राजस्थानने हिमाचल प्रदेश वर 44-37 अशी मात केली.
महाराष्ट्राने आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत विदर्भचा 48-24 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत कर्नाटक संघाशी होईल. कप्तान असलमने सामन्याच्या पहिल्याच चढाईत गुण घेत महाराष्ट्राचा इरादा स्पष्ट केला. 8व्या मिनिटाला लोण देत महाराष्ट्राने 11-03 अशी आघाडी घेतली. पुन्हा दुसरा लोण देत ही आघाडी 26- 06 अशी वाढविली. पहिल्या डावात 29-08 अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. उत्तरार्धात महाराष्ट्राने 3 अव्वल पकड करीत आपला बचाव देखील भक्कम आहे हे दाखवून दिले.









