वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अल्टिमेट टेबल टेनिसच्या (यूटीटी) सहाव्या मोसमाची सुरुवात अहमदाबादमधील एका एरिना येथे 31 मे पासून होणार आहे. पहिल्या दिवशी दोन लढती होणार असून विद्यमान विजेते धेम्पो गोवा चॅलेंजर्स व अहमदाबाद एसजी पायपर्स या सामन्याचाही त्यात समावेश आहे. दबंग दिल्ली टीटीसी व श्रीजा अकुलाच्या नेतृत्वाखालील जयपूर पॅट्रियट्स यांच्यात पहिला सामना होणार आहे.
या स्पर्धेत एकूण फ्रँचायझीं संघ सहभागी झाले असून एकूण 23 लढती होणार आहेत. यातील अंतिम लढत 15 जून रोजी होईल. यू मुम्बा टीटी यांची सलामीची लढत 1 जून रोजी पीबीजी पुणे जग्वार्स यांच्यात होईल. पदार्पण करणाऱ्या कोलकाता थंडरब्लेड्स यांचा पहिला सामना 2 जून रोजी चेन्नई लायन्सविरुद्ध होईल. मुंबई व अहमदाबाद (2 जून), धेम्पो गोवा व दबंग दिल्ली (4 जून) असे अन्य सामने होतील. 13 व 14 जून रोजी उपांत्य सामने होतील. प्रत्येक संघ साखळी फेरीत पाच सामने खेळेल तर प्रत्येक लढतीत पाच सामने खेळविले जातील. त्यात पुरुष एकेरीचे 2, महिला एकेरीचे 2 व एक मिश्र दुहेरीचा सामना असेल. साखळी फेरी संपल्यानंतर गुणतक्त्यातील पहिले चार संघ बाद फेरीत खेळतील, त्यानंतर उपांत्य व अंतिम लढती होतील.









