प्रतिनिधी / बेळगाव :
स्वातंत्र्यदिन व इतर उत्सव आल्यामुळे नैऋत्य रेल्वने बेंगळूर- बेळगाव- बेंगळूर या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे ( दोन फेरी ) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळाष्टमी व स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. बेळगाव- बेंगळूर या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने स्पेशल रेल्वेची मागणी होत होती. अखेर मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यशवंतपूर- बेळगाव शुक्रवार दि. 12 रोजी (रेल्वे क्र.07371, 07372) रात्री 9.30 वा. यशवंतपूर रेल्वेस्थानकातुन निघणार असून दुसर्या दिवशी सकाळी 8.25 वा. बेळगावला पोहोचणार आहे. सोमवार दि. 15 रोजी रात्री 9.20 वा. बेळगावमधून रेल्वे निघणार असून दुसर्या दिवशी सकाळी 8.20 वा. यशवंतपूर रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.
यशवंतपूर – बेळगाव एक्सप्रेस गुरूवार दि. 18 रोजी ( रेल्वे क्रमांक 07373 ) रात्री 9.30 वा. बेंगळुर येथून निघणार असून, दुसर्या दिवशी सकाळी 8.25 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर ( 07374 ) बेळगाव – यशवंतपूर एक्सप्रेस रविवार दि. 21 रोजी रात्री 9.20 वा. बेळगावमधून निघणार असून, दुसर्या दिवशी सकाळी 8.20 वा. यशवंतपूर येथे पोहोचणार आहे. या स्पेशल रेल्वेला 2 एसी-2 डबे, 3 एसीए-2 डबे, स्लिपर- 12 डबे, जनरल- 2 डबे व इतर 2 डबे जोडण्यात आले आहेत. खानापूर, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नसूर, हरिहर, दावणगेरे, चिकजाजूर, कडूर, असिकेरे, तिप्पतूर , तुमकुर या रेल्वेस्थानकांवर रेल्वे थांबणार आहे.









