पणजीला कुणी वाली नसल्याची केली खंत व्यक्त
पणजी : राजधानी पणजीत शहराची स्थिती दयनीय झाली आहे. तरीही पणजीच्या आमदाराने दुर्लक्ष केल्याने पणजीला कुणी वाली नसल्याची खंत उत्पल पर्रीकर यांनी काल शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. उत्पल पर्रीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या नावाखाली ऐतिहासिक पणजी शहराची वाताहत केली जात आहे. पणजी मार्केटची स्थित रामभरोसे आहे. रस्त्यांची अवस्था बिकट असून, अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही स्थानिक आमदार लक्ष घालत नसून, ते गायब आहेत की काय? असा प्रश्नही उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला. पणजी महापालिकेबाबतही अंदाधुंदी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेची बैठक झालेली नाही. अनेक नगरसेवक जनतेमध्ये वावरताना दिसत नाहीत. पणजीचे आमदार सरकारी कार्यक्रमांना नेहमी गैरहजर राहतात. मिरामार येथील प्रकल्पातच पणजीच्या आमदाराला स्वारस्य आहे की काय, अशी टीकाही उत्पल पर्रीकर यांनी केले.









