नवी दिल्ली :
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 12 जुलै रोजी बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असल्याची माहिती आहे. सदरच्या बँकेचे मुख्य कार्यालय वाराणसी येथे असून बँक आयपीओच्या माध्यमातून आगामी काळात 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओकरीता बँकेने 23-25 रुपये प्रति समभाग प्राइस बँड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिटेल गुंतवणूकदारांना आयपीओत कमीत कमी 15 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. यातील 75 टक्के हिस्सेदारी पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असणार आहे. एनआयआयकरीता 15 टक्के आणि रिटेल गुंतवणूकदारांकरीता 10 टक्के हिस्सा राखीव ठेवला आहे. आयपीओ 12 जुलैला खुला होणार असून 14 रोजी बंद होणार आहे. कंपनीचा समभाग 24 जुलै रोजी शेअरबाजारात लिस्ट होण्याची शक्यता सांगितली जात आहे. बँकेची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. 2017 मध्ये प्रत्यक्ष कार्यवाही बँकेची सुरु झाली.









