कोल्हापूर :
शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता शिवाजी पुल ते तावडे हॉटेलदरम्यान उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मार्गावरील जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, विद्युत तारा यांसारख्या युटिलिटींचे स्थलांतर आवश्यक असल्यामुळे महापालिकेने ‘इनोवेशन‘ या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे.
शिवाजी पुल ते तावडे हॉटेल दरम्यान उड्डाणपूल सुमारे पाच किलोमीटर लांबीचा असून तो शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. या मार्गावर अनेक अनुक्रमक चौक असून येथे नेहमीच वाहतूक कोंडी जाणवते. विशेष म्हणजे, या रस्त्यावर कोल्हापूरचे मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच मॅल्ट्री अॅक्सेस पॉईंट असल्यामुळे वाहतूक वर्दळ अधिकच वाढलेली आहे.
या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल उभारण्याची मागणी सुरू होती. याची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया, सिव्हिल कामे यासह सर्व टप्प्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
मात्र हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्यामुळे महत्त्वाच्या युटिलिटी सेवा बाधित होणार आहेत. त्यामुळे युटिलिटी स्थलांतराचे नियोजन अचूकपणे करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनीची गरज ओळखण्यात आली होती. त्या अनुषंगाने ‘इनोवेशन‘ या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही कंपनी संबंधित क्षेत्रातील सर्व युटिलिटीजचे सविस्तर सर्वेक्षण करून सुरक्षित स्थलांतरासाठी आराखडा तयार करणार असून, यामुळे प्रकल्प वेळेत आणि नियोजनबद्धरित्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे.








