प्रकाश वेळीप यांचे स्पष्टीकरण : ‘एसटी’ना राजकीय आरक्षणाची मागणी पूर्ण होईल
मडगाव : अनुसूचित जमातींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राजकीय आरक्षण न मिळाल्यास काही ‘एसटी’ संघटनांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून यासंदर्भात ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांना विचारले असता केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी आमची राजकीय आरक्षणाची मागणी पूर्ण करतील याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. मतदान करणे हा घटनात्मक हक्क असल्याने ‘उटा’ तरी निवडणुकीवर बहिष्कार घालणार नाही, असे वेळीप यांनी शुक्रवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वी मडगावच्या लोहिया मैदानावर काही ‘एसटी’ संघटनांनी एकत्र येऊन सभा घेतली होती. त्यात काही ठराव घेताना लोकसभा निवडणुकीपर्यंत 12 टक्के राजकीय आरक्षण न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यासंदर्भात शुक्रवारी वेळीप यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. अन्य राज्यांत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळालेले असले, तरी गोव्यात ते अजूनपर्यंत मिळालेले नाही. आम्ही त्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकार तसेच अन्य संबंधितांशी यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला असून निश्चितच न्याय मिळेल, असे वेळीप म्हणाले.
पावसाचा दगा : शास्त्रोक्त अभ्यास करण्याची गरज
पाऊस यंदा दगा देत असल्याने शेतकरी म्हणून आम्ही चिंतातूर असून याचा पिकांवर निश्चितच परिणाम जाणवेल. हवामान बदलावर नजर टाकल्यास यापुढे दुष्काळाचा सामना करावा लागेल की काय अशी चिंता भेडसावत आहे. सरकारने यासंदर्भात चिंतन करण्याची तसेच शास्त्राsक्त अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत वेळीप यांनी यावेळी व्यक्त केले. जगभरात 1 टक्का पाणी पिण्याजोगे असून असेच पाऊस न पडण्याचे प्रकार चालू राहिल्यास पिण्यासाठी पाणी मिळणे भविष्यात कठीण होऊ शकते. आमचे मंत्री मध्यंतरी अरब देशांना पाणी निर्यात करण्याचे भाष्य करताना दिसत होते. मात्र सद्यस्थिती पाहिल्यास आम्हालाच पाणी आयात करावे लागेल की काय असे वाटते, असे वेळीप म्हणाले.









