कला अकादमीचा स्लॅब कोसळण्याचे प्रकरण : सत्य बाहेर येण्याअगोदर राजीनामा मागणे चुकीचे
मडगाव : विधानसभा हे पवित्र स्थळ आहे. या पवित्र स्थळाचे महत्व सर्वांनी जपले पाहिजे. या ठिकाणी बेशिस्तपणा चालत नाही. कला अकादमीचा स्लॅब कोसळल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात पलक घेऊन विधानसभेत येणे हा प्रकार अत्यंत चुकीचा होता. विरोधी पक्षाच्या आमदारांना लोकांचे व गोव्याच्या हिताचे प्रश्न मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, हातात फलक घेऊन सभापतीच्या हौदात जाऊन गदारोळ घातला हा प्रकार योग्य नव्हता असे ‘उटा’ने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कला अकादमीचा स्लॅब कोसळण्याच्या प्रकरण्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे व जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे ‘उटा’चे नेते प्रकाश वेळीप म्हणाले. स्लॅब कोसळण्याच्या प्रकरणाची चौकशी होणे अद्याप बाकी आहे. जेव्हा चौकशी होईल, तेव्हा सत्य बाहेर येईलच. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यापूर्वीच कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना सरकारातून काढून टाकावे किंवा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणे अत्यंत चुकीचे असल्याचे श्री. वेळीप म्हणाले.
विधानसभा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने विरोधकांना आयती संधी मिळते व त्या संधीचा लाभ त्यांनी उठविलाच पाहिजे. स्थगन प्रस्ताव मांडण्याचा पूर्ण अधिकार देखील त्यांना आहे. पण, विधानसभेत फलक घेऊन जाणे हा प्रकार योग्य नव्हता असे मत प्रकाश वेळीप यांनी मांडले. आपण स्वता विरोधी पक्षात होता. त्यावेळी अभ्यासू व दिग्गज असे आमदार होते. त्यांनी कधीच अशी कृती केली नाही. सभापतीच्या हौदात अनेकदा ठिय्या मांडला जायचा. पण, एखादी वस्तु विधानसभेत घेऊन जाण्याची संधी आमदारांना दिली जात नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आत्ता ज्या प्रकारे आमदार फलक घेऊन येतात, त्यामुळे विधानसभेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याकडे सभापतींनी लक्ष दिले पाहिजे असे प्रकाश वेळीप म्हणाले. कला अकादमीचा कोसळलेला स्लॅब हा जुना होता. त्यामुळे मंत्री गोविंद गावडे यांना जबाबदार धरता येत नाही किंवा ते एकटेच या प्रकरणात दोषी नाही. या प्रकरणाची निपक्षपातीपणे संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर त्याची माहिती विधानसभेत दिली जाईल. तेव्हाच विरोधी आमदारांनी आवाज उठविणे उचित असल्याचे मत ही त्यांनी मांडले.
आदिवासीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
मंत्री गोविंद गावडे हे बहुजन समाजाचा बुलंद आवाज आहे. ते स्वता आदिवासी समाजातून पुढे आले आहेत. कला अकादमीचा स्लॅब कोसळण्याच्या प्रकरणावरून त्यांना टार्गेट केले जात आहे. आदिवासी समाजाचा आवाज दाबला जात असल्याचे प्रकाश वेळीप म्हणाले. मुसळधार पावसामुळे जुन्या इमारती कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सरकारने सर्व जुन्या इमारदीचे ऑडिट करायला पाहिजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला उटाचे पदाधिकारी दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, मोलू वेळीप व अनिल गांवकर उपस्थित होते.