रत्नागिरी :
जमीन विक्रीच्या बहाण्याने सरकारी कर्मचाऱ्याला तब्बल २२ लाख रुपयांचा चुना लावल्याचा आरोप असलेला व्याजी व्यावसायिक नीलेश कीर (४५, रा. भाटीमिऱ्या कीरवाडी) याला शहर पोलिसांकडून मंगळवारी अटक करण्यात आली. कीर याने वकिलाला हाताशी धरुन फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, अटक टाळण्यासाठी कीर याने रत्नागिरी न्यायालयापुढे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताच मंगळवारी शहर पोलिसांकडून कीर याला अटक करण्यात आली.
जिल्हा परिषद कर्मचारी संदीप मधुकर वेलोंडे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे वेलोंडे आणि कीर यांची ओळख होती.








