वार्ताहर /उसगांव
तिस्क उसगांव येथील पीडीए मार्केटामध्ये प्रवेश करणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना वाहन हाकताना कसरत करावी लागत आहे. मार्केट परिसरात प्रवेश करणाऱ्या गटारावर घालण्यात आलेल्या लोखंडी सळ्या व डांबर यांच्यात ख•ा पडून दरी निर्माण झाली आहे. येथील गटार बुजले असून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. विशेषत: दुचाकी वाहन चालकांना हा रस्ता डोकेदुखी बनली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. पालवाडा येथील महामार्गावर रस्त्याची चाळण झाली असून हा रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. नवीन पंचायत कार्यालयासमोरील रस्ताही उखडला आहे. उसगांव सर्कल येथे धुळीचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.