शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमध्ये नेहमीच एक ‘शीतयुद्ध’ होत असते. प्रत्येक जण आपापल्या खाण्याच्या सवयीचे हिरीरीने समर्थन करतो. काहीवेळा या दोघांमध्ये वादही पेटतो. कोणत्या तरी हाडामांसाच्या प्राण्याचा जीव घेतल्याखेरीज मांसाहार करता येत नाही, असा आरोप शाकाहारी लोकांचा असतो. पण मांसाहारी लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. दोघांपैकी कोणीही आपला हेका सोडत नाहीत.
ब्रिटनमधील यॉर्कशायर येथील एका महिलेला विचित्र खोड आहे. ती म्हणजे विशिष्ट प्रकारचे छोटे मासे ‘कच्चे’ खाण्याची. ही महिला इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणेच आहे. मात्र तिच्या या सवयीमुळे तिच्याकडे लोक वेगळय़ा दृष्टीने पाहतात. या महिलेने मासे कच्चे खातानाचा आपला व्हिडीओ टिकटॉकवर टाकला आहे. तिचे नाव एजी वॉलर असे असून ती 18 वर्षांची युवती आहे. अनेकदा ती बाजारात जाते. मासे खरेदी करते आणि एखादा छोटा मासा कच्चाच चावून बाजारातच खाऊन टाकते. हे दृष्य पाहणारे लोक आश्चर्यचकित होतात. कारण सहसा मांस त्यावर प्रक्रिया करुन, भाजून, तळून किंवा शिजवूनच खाल्ले जाते. शिवाय ही अग्नीप्रकिया होत असताना त्या मांसात मसाले आणि इतर चवीचे पदार्थही टाकले जातात. मीठ घातले जाते. पण अशी कोणतीही प्रक्रिया न करता ही महिला मासे सरळच मटकावते. हा त्या भागात चर्चेचा विषय बनला आहे.
मांस कच्चे खाल्यास पोटात गंभीर व्याधी निर्माण होतात. आतडय़ांमध्ये टेपवर्म नामक जंत निर्माण होतात. ते 56 फुटांर्पंत लांब असू शकतात. त्यांचे व इतर व्याधींचे प्रमाण वाढल्यास मृत्यूही होऊ शकतो. मांस कदापिही कच्चे खाऊ नका असा सल्ला यासाठीच आहारतज्ञांकडून दिला जातो. मात्र या महिलेला आजवर असा कोणताही विकार झालेला नाही. अर्थात, कोणीही तिचे अनुकरण अशा बातम्या वाचून अजिबात करु नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.









