जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : अधिक लाभार्थ्यांची निवड करून प्रगती साधावी
बेळगाव : अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी करावी. नियोजित वेळेत प्रगती साधून उद्दिष्ट गाठावे. योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक या समाज माध्यमांचा उपयोग करावा. याद्वारे जनजागृती करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी प्रधानमंत्री 15 कलमी योजनेच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत उद्दिष्ट साध्य केले आहे. मत्स्यपालन खात्याकडून अल्पसंख्याकांसाठी विविध योजना पुरविणे आवश्यक आहे. अधिक लाभार्थ्यांची निवड करून प्रगती साधावी, अशी सूचना केली.
रेशीम उत्पादन वाढ करण्यासाठी रेशीम खात्याकडून योजनांवर 70 टक्के सबसीडी देण्यात येत आहे. मात्र केवळ 20 टक्के लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी रेशीम खात्याने योजनांची जनजागृती करून उद्दिष्ट गाठावे, अशी सूचना रेशीम खात्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. झोपडपट्टी विकास निगमकडून गेल्यावर्षी विविध योजना राबवून 6 टक्के प्रगती करण्यात आली आहे. यावर्षातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी एप्रिलमध्ये वर्क ऑर्डर सुरू करण्यात आल्या आहेत. अनुदानासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. उद्योग विनिमय केंद्रांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उद्योग मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शिक्षण खात्याकडून या शैक्षणिक वर्षात 90 टक्के पुस्तके वितरण करण्यात आली आहेत. तर 100 टक्के गणवेश वितरण करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आरोग्य खाते, जिल्हा पंचायत, बागायत यांच्यासह विविध खात्याच्या योजनांचा आढावा घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यास विलंब करण्यात येवू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. तर योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. पोलीस खात्याकडून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून जनजागृती संदेश गावोगावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारेच इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनीही योजनांची माहिती पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, जिल्हा पंचायत मुख्य योजना अधिकारी गंगाधर, अल्पसंख्याक खात्याचे उपसंचालक अब्दुलरशीद मिरजण्णावर, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर, बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









