दहशतवाद्यांना संदेश पोहोचविण्याकरता वापर : युवतींचाही समावेश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना स्वत:च्या ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या स्वरुपात महिला, युवती आणि लहान मुलांचा वापर करत आहेत. आयएसआयकडून महिला अन् मुलांकडून शस्त्रास्त्र तसेच अमली पदार्थांचा पुरवठा करविला जात असल्याचा खुलासा सैन्याच्या वरिष्ठ कमांडरने केला आहे.
अलिकडच्या काळात गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलवर वेगाने कारवाई केली आहे, यामुळे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी स्वत:च्या कारवायांसाठी महिला अन् मुलांना सॉफ्ट टार्गेट केले आहे. नियंत्रण रेषेच्या पलिकडे असलेले दहशतवादी म्होरके सद्यस्थिती बिघडविण्याचा कट रचत आहेत. दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांना अधिक सतर्क रहावे लागणार असल्याचे चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजला यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांनी दहशतवादी कारवायांसाठी टेकिंट म्हणजेच टेक्निकल इंटेलिजेन्सचा वापर खूपच कमी केला आहे. म्हणजेच आता ते संभाषण किंवा संदेश पाठविण्यासाठी मोबाइल यासारख्या साधनांचा वापर टाळत आहेत. दहशतवाद्यांकडून आता पारंपरिक साधनांचा वापर वाढत असल्याचे औजला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही काम करत आहोत. लोकांना जागरुक करण्यासाठी सैन्य ‘सही रास्ता’ कार्यक्रम राबवत असून यात मुले आणि महिलांशी संवाद साधला आहे. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लेफ्टनंट जनरल औजला म्हणाले.
काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु पीर पंजालच्या दक्षिणेसोबत पंजाबमध्ये घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत. शेजारी देशाने स्वत:चा दुष्ट हेतू सोडून दिला नसल्याने आव्हान कायम आहे. पाकिस्तान आता वारंवार पीर पंजालच्या दोन्ही बाजूला समस्या उभी करू पाहत आहे. याचबरोबर उत्तर काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत. कुठल्याही स्थितीत सुरक्षेत घट होऊ न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशाची सुरक्षा हीच आमची प्रमुख जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारावर मोहिमा राबविण्यात आल्याने दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश दहशतवादी काश्मीर खोऱ्यातून बाहेर गेले आहेत किंवा निष्क्रीय झाले आहेत. दहशतवादाचे अदृश्य रुप चिंतेचे कारण असल्याने आम्ही या दिशेने काम करत आहोत. स्थानिक किंवा विदेशी दहशतवाद्यांची अचूक संख्या सांगणे अवघड आहे, परंतु एका अनुमानानुसार हा आकडा निश्चितपणे मागील 33 वर्षांमध्ये सर्वात कमी राहिला असल्याचे उद्गार औजला यांनी काढले आहेत.
दहशतवादी कारवायांमध्ये घट
दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद तसेच सुरक्षा दलांमध्ये चकमकीचे प्रमाण यंदा काश्मीरमध्ये कमी झाले आहे. हा एक सकारात्मक संकेत आहे. स्थानिक लोकांच्या वर्तनातही मोठा बदल घडून आला आहे. हा बदल कायम राखणे आमची जबाबदारी आहे. बदललेल्या सुरक्षा वातावरणात आम्ही स्वत:च्या कार्यप्रणालीत देखील बदल केला असल्याचे लेफ्टनंट जनरल औजला यांनी नमूद केले आहे.









