विरोधक – जनतेकडून उमटली संतप्त प्रतिक्रिया : म्हादईनंतर कदंबही कर्नाटककडे वळविल्याची टीका
पणजी : अंकोला कारवार येथील भाजपच्या प्रचार सभेसाठी गोव्यातील कदंब परिवहन महामंडळाच्या सुमारे 140 बसगाड्या नेण्यात आल्या होत्या. मंगळवारी त्या पाठवण्यात आल्या आणि बुधवारी सभा संपल्यानंतर त्या परत आणण्यात आल्या. या प्रकरणी सध्या गोवा राज्यात चर्चा रंगली असून म्हादईच्या पाण्यासोबत आता कदंब या सरकारी महामंडळाच्या बसगाड्याही कर्नाटकात सभेसाठी वळवण्यात आल्याची टीका होत आहे. तसेच म्हादई पाठोपाठ आता कदंब महामंडळातूनही राजकीय स्वार्थ साधण्यात आल्याचे समोर आले आहे. सभेसाठी लोकांना आणण्याकरीता आणि परत नेण्यासाठी या कदंबच्या बसगाड्या वापरण्यात आल्या. कर्नाटक एसटी महामंडळाकडे शेकड्यांनी बसगाड्या असताना गोव्यातील कदंबच्या बसगाड्या कर्नाटकात नेण्याची काय गरज होती? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कर्नाटकाच्या लोकांना सभेसाठी ने-आण करण्याकरीता गोव्यातील कदंब बसगाड्या नेण्याची गरजच नव्हती, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यात उमटली आहे. या बसगाड्या तिकडे रिकाम्या गेल्या आणि रिकाम्या परत आल्या. त्यांचा डिझेलचा, चालक इतर कर्मचारी यांचा खर्च कोणाच्या माथ्यावर? गोव्याच्या की कर्नाटकाच्या की गोव्यातील सर्वसामान्य जनतेच्या? असे अनेक प्रश्न या प्रकरणातून समारे आले आहेत. या सभेसाठी काणकोण व इतर सीमा भागातून काही लोकांना नेण्यात आले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कदंब महामंडळ आधीच तोट्यात असून ते आणखी नुकसानीत जावे म्हणून या बसगाड्या तिकडे नेण्यात आल्या की काय ? असा सवालही उपस्थित झाला आहे.
मार्गावरील बसगाड्या वापरल्या नाहीत : घाटे
कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी त्या बसगाड्यांसंदर्भात खुलासा करताना सांगितले की, कर्नाटकातील सभेसाठी सुमारे 125 कदंब बसगाड्या कंत्राटी पद्धतीने देण्यात आल्या होत्या. गोव्यातील विविध मार्गावर धावणाऱ्या बसगाड्या काढून त्या पाठवण्यात आलेल्या नाहीत. शाळांसाठी वापरण्यात येणाऱ्या बसगाड्या देण्यात आल्या. शाळा सध्या बंद असून त्यासाठी 143 बसगाड्या चालतात. त्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. बंद असलेल्या बसेस वापरण्यात काहीच हरकत नाही. मार्गावर धावणाऱ्या बसगाड्या नियमितपणे चालू होत्या. त्यात कुठेही खंड पडला नसल्याचा दावा घाटे यांनी केला आहे.









