सुलेमान खान सिद्दीकीचा दावा : पहिल्या व्हिडिओतील माहिती खरी असल्याचे केले स्पष्ट
पणजी : राज्यातील विविध जमीन हडप प्रकरणात हात असलेला आणि पोलिसांच्या तावडीत असलेला मुख्य संशयित आरोपी सुलेमान सिद्दीकी याने पुन्हा एकदा पोलिस खात्यावर आरोप करून बॉम्ब टाकलेला आहे. पोलिस कोठडीतून पळून गेल्यानंतर क्राईम ब्रँचच्या ‘एसआयटी’ने अटक केल्यानंतर ‘गन पॉईंट’चा वापर करून पोलिसांनी आपल्याकडून दुसरा व्हिडियो तयार केला हा व्हिडियो बनावट होता, असा आरोप सुलेमान सिद्दीकीने केल्याने पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. क्राईम ब्रँचच्या पोलिस कोठडीतून पलायन प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अटक केलेला संशयित सुलेमान हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, त्याची पोलिस कोठडी संपल्याने ती वाढवून घेण्यासाठी त्याला न्यायालयात आज आणण्यात आले होते. पलायन प्रकरणी न्यायालयात आज आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सुलेमान सिद्दीकीला आल्तिनो येथील प्रथमवर्ग न्यायालयात काल उभे केल्यानंतर न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सुलेमान सिद्दीकी याने पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. सिद्दीकी याने सांगितले की, एसआयटीने मला अटक केल्यानंतर ‘गन पॉईंट’वर आपल्याकडून दुसरा व्हिडिओ काढण्यास मला भाग पाडले. हा व्हिडिओ पूर्णत: बनावट होता, त्यासाठी त्यांनी मला इलेक्ट्रिक शॉक देऊन छळ केला, असा आरोपही त्याने केलेला आहे. सुलेमान हा कोठडीतून पसार झाल्यानंतर पोलिस खात्याची नाच्चकी झाली होती. त्यानंतर सरकारवरही विरोधक टीका करीत होते. सुलेमान याने एक व्हिडिओ जारी करून पोलिस व एका आमदाराचे नाव घेतले होते. त्यानंतर सुलेमानला केरळ या ठिकाणी शोध घेऊन अटक करण्यात आली. तेव्हाच एक नवा व्हिडिओ जारी केला आणि त्यात सुलेमानने अॅड. मित पालेकर यांच्या सांगण्यावरून आपण व्हिडिओ काढण्याचा दावा केला होता, असे आता सुलेमानने सांगितल्याने त्याचे दुसरे रूप समोर आलेले आहे.
संशयित आरोपी सुलेमान याने सांगितले की, पहिला व्हिडिओ अॅड. अमित पालेकर यांना मी पाठवलेला होता. पण, हा व्हिडिओ व्हायरल करण्यासंबंधी सांगितले नव्हते, तर त्या व्हिडिओच्या आधारे न्यायालयात अर्ज सादर करण्यात सांगण्यात आले होते. पण त्यानंतर क्राईम ब्रँच (एसआयटीच्या) पथकाने केरळ येथे सुलेमानला अटक केली आणि डोक्याला पिस्तुल लावून पोलिसांनी पहिल्या व्हिडिओमध्ये जे सुलेमानने आरोप केले होते, ते अॅड. पालेकर यांनीच करायला लावले होते, असे दुसऱ्या व्हिडिओत सांगण्यास भाग पाडल्याचेही सुलेमान सिद्दीकीने आता माहिती दिल्याने या प्रकरणावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, पत्रकारांशी अधिक बोलण्याची संधी न देता सुलेमान सिद्दीकी याला ओढतच पोलिसांनी वाहनात बसवले.









