वृत्तसंस्था/ अयोध्या
उत्तरप्रदेशातील अयोध्या या तीर्थक्षेत्री एक खळबळजक प्रकार उघडकीस आला आहे. अयोध्या पोलिसांनी 7 संशयित चिनी नागरिकांसोबत 7 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाराणसी येथील एका वकिलाच्या तक्रारीच्या आधारावर बनावट व्हिसा प्राप्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी आता उच्चस्तरावर तपास केला जात आहे.
अयोध्येत बनावट दस्तऐवजांच्या आधारावर व्हिसा प्राप्त करण्याचे प्रकरण समोर आले आहे. अयोध्येत चीनच्या 3 नागरिकांमसवेत 7 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. वाराणसी येथील एका वकिलाच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर पोलीस आता याप्रकरणी तपास करत बनावट व्हिसा पुरविणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
महोबोधो सोसायटी ऑफ इंडियाने वाराणसीतील वकील राजेंद्र झा यांना स्वत:चा अधिवक्ता म्हणून नेमले आहे. श्रावस्ती जिल्ह्यातील चायना मंदिराशी संबंधित प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी वकील अयोध्या येथे पोहोचले होते. तेथे सोसायटीचे महासचिव सारनाथ पी सिवलीथेरो यांनी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध केली होती. तसेच काही विदेशी नागरिक बनावट दस्तऐवजांद्वारे व्हिसा प्राप्त करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
याप्रकरणी तपास करण्यात आला असता भारत सरकारच्या गृह मंत्रालयासमोर बनावट दस्तऐवज सादर करत चीनचे नागरिक मैसिंग चियांग, यू मंडल सरना समवेत प्रदीप बौद्ध, गोविंद, यू लक्ष्मी राव, लाजपत राव यांनी व्हिसा प्राप्त केल्याचे दिसून आले. यातील चिनी नागरिक काही वर्षांपूर्वी अयोध्येत वास्तव्यास होता.









