पुणे / प्रतिनिधी :
सर्वोच्च न्यायालयाने भारतीयांना भूकबळीपासून वाचवावे. बीटी बियाण्यांचा वापर करण्याची परवानगी द्यावी. भारतात सर्व राजकीय पक्ष, पर्यावरणवादी यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळेच बीटी बियाण्यांच्या वापराला विरोध केला जात आहे. हा विषय अतिशय गंभीर असून, यावर वेळीच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा, भारताची अन्नसुरक्षा धोक्यात येईल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पुण्यात आले असता पाटील बोलत होते. ते म्हणाले, बीटी बियाणांचा वापर जगभरात केला जात आहे. यातून उत्पन्नही जास्त आहे. मात्र, याला भारतातून विरोध केला जात आहे. याला सरकार, सर्वच राजकीय पक्ष तसेच पर्यावरणवाद्यांकडून विरोध सुरू आहे. पण या बियाणांच्या वापरामुळे देशाला काहीही धोका नाही. बीटी बियाणांच्या वापरावर वेळीच निर्णय घेतला नाही, तर देशाला अन्नधान्य टंचाईपासून कोणीही रोखू शकणार नाही. त्याला सरकार, विरोधी पक्ष, पर्यावरणवादी हे सर्व जबाबदार असतील. यासंबंधी तज्ञांनी अभ्यास करावा. म्हणजे यातील सत्यता लक्षात येईल.
अधिक वाचा : मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा
न्यायालयाने निर्णय घ्यावा
अन्न काही कारखान्यात तयार होत नाही. म्हणून यावर गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. बीटी बियाणांचा देशाला काहीही धोका नाही. अन्नधान्याबाबत देश अडचणीत आणू नका. झाला तेवढा खेळ पुरा झाला. अशाने देशातील 140 कोटी लोकांचे पोट भरणार नाही. आत्तापर्यंत 23 वर्षे या प्रकरणाच्या निकालाला वेळ लागला. यावर सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय द्यावा, अशी अपेक्षाही रघुनाथदादांनी व्यक्त केली.