पाच वर्षांनंतर पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध एफआयआर
बेळगाव : केपीएससीच्यावतीने घेण्यात आलेल्या एसडीए व एफडीए परीक्षेत अत्याधुनिक ब्ल्यू टूथचा वापर करून घोटाळा केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध येथील कॅम्प पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षेनंतर तब्बल पाच वर्षांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. अमित अरुण पाटील, रा. गोकाक, लक्ष्मण उद्दाप्पा बंडी, रा. मालदिन्नी, ता. गोकाक, शिवलिंग सिद्धलिंग पाटील, रा. नल्लानट्टी, ता. गोकाक, मारुती बसवराज पुर्ले, रा. कोननकोप्प, ता. हानगल, जि. हावेरी, हणमंत दुंडाप्पा गौडी, रा. अरभावी या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून सीआयडी एफआययुच्या (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल झाला आहे.
सीआयडीचे पोलीस निरीक्षक रमेश के. टी. यांनी बुधवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे. ज्या पाच जणांवर एफआयआर दाखल झाला आहे, त्यापैकी एक असलेला हणमंत गौडी हा पोलीस दलात आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 16 जून 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये एसडीए व एफडीएसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अमित पाटील याने अत्याधुनिक ब्ल्यू टूथच्या माध्यमातून घोटाळा केला आहे. याकामी उर्वरित आरोपींनी त्याला मदत केली आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरून अमितला प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आली, तो क्रमांक सीआयडीने शोधून काढला आहे.
गोकाकमध्ये लक्ष्मण बंडी व शिवलिंग पाटील हे एकलव्य कोचिंग सेंटर व दारीदीप कोचिंग सेंटरच्या माध्यमातून एसडीए, एफडीए, पोलीस, पीएसआय आदी स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण देतात. मारुती पुर्ले, अप्पय्या नायक हेही परीक्षार्थींना प्रशिक्षण देतात. हणमंत गौडी या पोलिसाचीही त्यांना साथ मिळाली. परीक्षेत घोटाळा करण्यासाठी आवश्यक सीमकार्ड खरेदी करून हणमंतनेच उर्वरित आरोपींना दिली आहेत. बी. के. मॉडेल येथील परीक्षा केंद्रावर अमित पाटील हा परीक्षा लिहित होता. त्यावेळी ब्ल्यू टूथ डिव्हाईसच्या माध्यमातून त्याला बाहेरून माहिती पुरवण्यात येत होती. यासाठी दोन मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला आहे. राणेबेन्नूर येथील परीक्षा केंद्रावरही ब्ल्यू टूथ डिव्हाईसचा वापर झाल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याच दिवशी राणेबेन्नूर ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता पाच वर्षांनंतर बेळगावातही एफआयआर दाखल झाला आहे.









