कृषी खात्याच्या अधिकाऱयांकडून शेतकऱयांना मार्गदर्शन ; अझोला वनस्पतीचा वापर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी खात्यातर्फे विविध उपक्रम राबवून उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी खात्यामार्फत शुक्रवारी होनगा येथील शिवारात ‘अझोल’चा वापर करून भातरोप लागवड कशी करावी, याबाबत शेतकऱयांना कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले. चक्क शिवारात जाऊन ‘अझोला’च्या माध्यमातून शेती उत्पादन कसे घ्यावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
शेतातील उत्पादन वाढीबरोबर जनावरांना खाद्य म्हणून ‘अझोल’ जलशेवाळ वनस्पतीचा वापर होतो. अझोलाचा शेती उत्पादनासाठी वापर केला जातो. शेतीत खत म्हणून याचा वापर झाल्यास उत्पादनात वाढ होते. शिवाय युरियाची गरज भासत नाही. त्याबरोबर तण कमी होण्यासही याची मदत होते. त्यामुळे शेतकऱयांनी अझोला वनस्पतीचा वापर करावा, असे आवाहनदेखील कृषी उपनिर्देशक एच. डी. कोळेकर यांनी केले आहे.
अलीकडे शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. अझोला जलशेवाळाचा वापर केल्यास रासायनिक खतदेखील कमी प्रमाणात लागणार आहे. शिवाय अझोला जलशेवाळ वनस्पती घरच्या घरीदेखील तयार करता येते. याबाबतही शेतकऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी होनगा येथील शिवारात अझोला जलशेवाळ सोडून रोप लागवड करण्यात आली. यावेळी कृषी खात्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.