कोल्हापूर :
अंतरिम जामिन फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर याने पसार होण्यासाठी दोन मोटारींचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक वाहन स्वत:चे होते, मात्र वाहनाच्या नंबरवरुन आपण सापडू शकतो या भितीने त्याने वाहन बदलल्याची माहिती कोरटकरच्या गुरुवारी केलेल्या तपासात समोर आली आहे. त्याला मदत करणाऱ्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची नावे चौकशीत समोर आली असून, त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या प्रशांत कोरटकर याला सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून अटक केला होती. सध्या कोरटकर पोलीस कोठडीत असून, गुरुवारी दिवसभर त्याची कसून चौकशी करण्यात आली. अटकेतील कोरटकर याची पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत बुधवारी रात्री सुरू केलेली चौकशी गुरुवारी पहाटेपर्यंत पुन्हा दिवसभरही सुरू राहिली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो पसार काळात कुठे फिरला? त्याला कोणी मदत केली? त्याने कुठे मुक्काम केले? या काळात तो कोणाच्या संपर्कात होता? गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मोबाइलमधील डेटा का डिलिट केला? पसार काळात तो इतरांच्या मोबाइलवरून कोणाच्या संपर्कात होता काय? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
- अटकेच्या भितीने स्वत:ची कार निम्म्यात सोडली
अंतरिम जामिन फेटाळल्यानंतर कोरटकर याने पसार होण्यासाठी दोन मोटारींचा वापर केला आहे. सुरुवातील पळून जाण्यासाठी त्याने स्वत:ची कार वापरली. कारच्या नंबरवरून पोलिसांना सापडू नये, यासाठी त्याने आपली कार निम्म्यातच सोडली. नंतर एका मित्राची कार वापरली. गुह्यात वापरलेल्या दोन्ही कार जप्त करण्यात येणार आहेत.
- मदत करणाऱ्यांची होणार चौकशी
पसार काळात कोरटकर काही मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कात होता. या काळात त्याला आर्थिक पुरवठा करणे, वाहनाची व्यवस्था करुन देणे अशी मदत नातेवाईकांसह मित्रांकडून करण्यात आली आहे. त्यांची नावे गुरुवारी चौकशीत समोर आली आहेत. या सर्वांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. संबंधीतांना चौकशीकामी हजर राहण्याची नोटीस बजावण्याच्या तयारी जुना राजवाडा पोलिसांकडून सुरु आहे. त्यासाठी काही दिवसांत पोलिसांचे एक पथक नागपूरला जाण्याची शक्यता आहे.
- गांधीनगर प्राथमिक रुग्णालयात वैद्यकीय चाचणी
सोमवारी कोरटकरला अटक केल्यानंतर जयसिंगपूय येथे मंगळवारी पहाटे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी लवकर पुन्हा कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी सुमारे 1 तास कोरटकरला बाहेर काढण्यात आले होते.
- आज न्यायालयात करणार हजर
मंगळवारी कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी (आज) संपणार आहे. यामुळे आज दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अजून तपास बाकी असल्याने पोलिसांकडून आणखी काही दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागण्याची विनंती न्यायाधीशांकडे करण्यात येणार आहे.
- कोरटकरची माहिती आणि त्यावेळचे सिसीटीव्ही तपासणार
कोरटकर याची मंगळवार रात्री पासून सलग चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीमध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे. काही अडचणींच्या प्रश्नावर त्याने मौन साधले असून, तपासात तो सहकार्य करत आहे. तपासादरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी एक पथक नागपूरला रवाना होणार आहे. कोरटकरने 17 तारखेनंतरची जी माहिती दिली आहे. त्या त्या ठिकाणचे आणि त्या त्या वेळचे सिसीटीव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेणार आहेत.
- कोरटकरकडे चौकशी सुरू : अजित पोवार
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. कोरटकरने पोलिसांसमोर कबुली जबाब दिला आहे. याबाबत अजून चौकशी सुरु असून, आवश्यक ती कागदपत्रे सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीत उपमुख्यमंत्री अजित पोवार यांनी दिली.








